मनोरुग्णांना नवे जीवन देणारे ‘सुदामा मित्र’ योजना सुरू होणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:00 AM2020-12-25T07:00:00+5:302020-12-25T07:00:06+5:30
Nagpur News मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांना २०१२ मध्ये महापालिका मित्र म्हणून मदत करणार होते. महापालिकेने या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘सुदामा मित्र’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर प्रादेशिक मनोरुग्णालयाने पुढाकार न घेतल्याने ही योजना बारगळली.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनोरुग्णाचे जीवन मागे टाकून सर्वसामान्यांसारखे आनंददायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांना २०१२ मध्ये महापालिका मित्र म्हणून मदत करणार होते. महापालिकेने या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘सुदामा मित्र’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु नंतर प्रादेशिक मनोरुग्णालयाने पुढाकार न घेतल्याने ही योजना बारगळली. त्यावेळी दयाशंकर तिवारी हे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष होते, आता ते महापौर आहेत. यामुळे आता तरी ही योजना सुरू होईल का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-अशी होती योजना
उपचारानंतर बरे झालेल्या ज्या मनोरुग्णांना त्यांचे कुटुंबीय घरी नेत नाही, त्यांचे महापालिका पुनर्वसन करणार होती. धंतोली झोन कार्यालय परिसरातील महापालिका शाळेच्या इमारतीचे यासाठी नूतनीकरण केले जाणार होते. येथे निवासासाठी खोल्या तयार केल्या जाणार होत्या. व्यायामासाठी उद्यान तयार केले जाणार होते. सुरुवातीला मनोरुग्णालयातून ५०-५० जणांना सकाळी येथे आणले जणार होते. त्यांना दिवसभर येथील मोकळ्या वातावरणात ठेवणार होते. सायंकाळी पुन्हा मनोरुग्णालयात परत नेणार होते. एकदा ते बाहेरच्या वातावरणात मिसळले की, नंतर त्यातील काहींना येथेच रात्रीही कायमस्वरूपी मुक्कामाने ठेवले जाणार होते. त्यांच्यावर नियंत्रण व उपचारासाठी मनोरुग्णालयातील डॉक्टरांसोबतच महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले वरिष्ठ डॉक्टर आपली सेवा देणार होते. या पुनर्वसन केंद्राची देखभाल-दुरुस्ती महापालिका, एनजीओ व मनोरुग्णालय तिघे मिळून करणार होते.
- मन रमण्यासाठी हाताला काम
मनोरुग्णालयातील साचेबंद वातावरणातून बाहेर पडणाऱ्या या रुग्णांचे पुनर्वसनस्थळी मन रमावे, यासाठी त्यांच्या हाताला काम देण्याची योजना होती. ग्रीटिंग, लिफाफा, फाईल, मेणबत्ती तयार करणे यासारख्या हलक्या कामाचे त्यांना प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांनीच विकाव्या, यासाठी तेथेच स्टॉलही लावून दिले जाणार होते. अशाप्रकारे त्यांना बाहेरच्या जगाशी हळूहळू एकरूप केले जाणार होते.
-२०१२ मध्ये मंजुरी मिळाली होती
२०१२ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले दयाशंकर तिवारी यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला होता. पुनर्वसन केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३० लाख ५८ हजार ३९४ रुपयाच्या कामासाठी निविदा मागविण्यास मंजुरी मिळाली होती. निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करून जानेवारी-२०१३ च्या शेवटी या प्रकल्पाचे काम सुरू होणार होते.
-जगण्याच्या उमेदीला प्रतीक्षेचा अभिशाप
प्रादेशिक मनोरुग्णालयातील उपचारानंतर बरे झालेल्यांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिला आहेत. यातील काही रुग्ण दहाच्यावर वर्षांपूर्वीच बरे झालेले आहेत. परंतु अनेकांना आपला पत्ताच आठवत नाही, तर कुणाला तो नीट सांगता येत नाही. यातील काहींचे वय ५० ते ६० च्या दरम्यान आहे. यामुळे उतरत्या वयात स्वकीयांची प्रतीक्षा तीव्र झाली आहे. रुग्णालयाच्या भल्यामोठ्या लोखंडी प्रवेशद्वाराकडे त्यांची नजर लागली आहे. कुणी येईल आणि आपल्याला घेऊन जाईल, या प्रतीक्षेत रोजचा दिवस ढकलत आहेत.
-मनोरुग्णालयाने नव्याने योजना तयार करावी
२०१२ मध्ये प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पुढाकारामुळे ‘सुदामा मित्र’ योजना तयार केली होती. परंतु पुढे रुग्णालयांकडून प्रतिसाद मिळाला नाही. परंतु आता तरी रुग्णालयाने ही बाब मनावर घेतल्यास एक चांगली योजना साकारली जाऊ शकते.
-दयाशंकर तिवारी
महापौर, महानगरपालिका