फुटाळा तलावात माशांचा अचानक मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट
By निशांत वानखेडे | Published: April 6, 2024 05:26 PM2024-04-06T17:26:15+5:302024-04-06T17:29:04+5:30
फुटाळा तलावात गेल्या काही दिवसात अचानक शेकडाे मासे मृत्युमुखी पडत असून तलाव काठावर मृत माशांचा खच दिसून येत आहे.
निशांत वानखेडे,नागपूर :फुटाळा तलावात गेल्या काही दिवसात अचानक शेकडाे मासे मृत्युमुखी पडत असून तलाव काठावर मृत माशांचा खच दिसून येत आहे. माशांच्या मृत्युचे कारण समाेर आले नाही, मात्र वाढत्या उष्णतेमुळे की तलावात काही रासायनिक टाकल्यामुळे मृत्यु हाेत असल्याची शंका घेतली जात आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेले फुटाळा तलाव गेल्या काही वर्षात फाउंटेनमुळे चर्चेत आहे. तलावाच्या जैवविविधतेला धाेका हाेण्याचे कारण पुढे करीत पर्यावरण कार्यकर्त्यांनी यावर आक्षेपही घेतला हाेता. शिवाय फाउंटेनच्या नावाने माेठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामाला विराेध करीत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर्षी विसर्जनास बंदी घातल्यामुळे स्थिती बिघडली नाही.
मात्र, तलावात माेठ्या प्रमाणात कचरा पडलेला साचला असल्याने गढूळपणा वाढला व पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे तापमान वाढल्याने उष्णतेच्या कारणाने मासे मृत्युमुखी पडत असल्याचे बाेलले जात आहे. मात्र यापूर्वी कधी उन्हाळ्यात अशाप्रकारे मासे मृत्युमुखी पडले नाही. फाउंटेनच्या कामादरम्यान तलावाच्या पाण्यात रासायनिक घटक मिसळल्याचीही शंका घेतली जात आहे. मात्र तलाव परिसरात माेठ्या प्रमाणात झालेल्या बांधकामामुळे तलावाची जैवविविधता धाेक्यात आली असून माशांचा मृत्यु हे त्याचेच कारण असल्याचे पर्यावरण कार्यकर्त्यांकडून दिले जात आहे.