आम्ही चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो...; सुधाकर गायधनींच्या ‘महावाक्याची’ विदेशात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 01:20 PM2020-09-19T13:20:32+5:302020-09-19T13:21:01+5:30
आम्ही चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो, गिऱ्हाईक कसे ते फिरकेना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाकवी सुधाकर गायधनी यांचे बहुचर्चित ‘महावाक्य’ याच्या ५५५ पानांच्या महाकाव्याची दखल युरोप-अमेरिकेने घेतली असून, या महाकाव्याला आता जगाने मान्यता दिल्याचेच हे द्योतक आहे.
आम्ही चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो
गिऱ्हाईक कसे ते फिरकेना ...
मग, सोने पांघरून
चिंध्या विकत बसलो,
गर्दी पेलवता पेलवेना...
या ओळींचा मा. यशवंतराव चव्हाण आपल्या भाषणातून उल्लेख करायचे. माजी मंत्री मा. राजेंद्रबाबू दर्डा यांनीसुद्धा या काव्यओळींचा जाहीर उल्लेख केला आहे. आता या ओळींचे मर्म जगाच्या चिंतनाचा विषय बनणार आहे. युरोपमधील रोमानिया या देशातील ‘कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल’ या वाङ्मयीन नियतकालिकाने आपल्या २०० व्या विशेषांकात गायधनीच्या ‘महावाक्य’ या काव्याकरिता १९ पाने खर्ची घातली आहेत.
‘महावाक्य हे एक अभिजात महाकाव्य आहे’ या शीर्षकाच्या दहापानी लेखासह महावाक्यातील नऊ पानांचा काव्यखंडही या अंकात प्रकाशित झाला आहे. या नियतकालिकाचे युरोप आणि उत्तर अमेरिकेसह जगभरात २० हजारांहून अधिक वाचक आहेत. या नियतकालिकाचे संपादक रोमानियाचे प्रसिद्ध कवी डॉ. पेण्डेफुंडा आणि त्यांच्या पत्नी आहेत. हे नियतकालिक रोमानियन आणि इंग्रजी भाषेचे त्रैमासिक असून, या अंकातील गायधनींच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद आणि संशोधनपर लेख प्रा. डॉ. ओम बियाणी या आंतरराष्ट्रीय साहित्यिकाचा आहे. यापूर्वीच त्यांनी ‘देवदूत’चा केलेला इंग्रजी अनुवाद ‘देवदूत-दी एंजल’ या नावाने रायटर्स वर्क्सशॉप कोलकाताने प्रकाशित केला असून, त्याची युनेस्को संस्थेच्या इंडेक्स ट्रान्सलेशनम डेटाबेस या विश्वयादीत नोंद झाली आहे. या कवितेमुळे गायधनींना युनेस्को मान्यता प्राप्त विश्वकवी परिषदेच्या मंगोलिया येथील संमेलनात डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे.