सुधाकर कोहळेंना तिळगुळ
By admin | Published: January 17, 2016 02:47 AM2016-01-17T02:47:33+5:302016-01-17T02:49:07+5:30
दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांना मकरसंक्रांतीचा तिळगुळ मिळाला आहे.
भाजपाच्या शहर अध्यक्षपदी निवड : महाल कार्यालयात पदग्रहण
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांना मकरसंक्रांतीचा तिळगुळ मिळाला आहे. शनिवारी पक्षाच्या बैठकीत एकमताने त्यांची शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होऊन कोहळेंकडे शहराची धुरा सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सायंकाळी महाल येथील टिळक पुतळा कार्यालयात एका छोटेखानी सोहळ्यात मावळते अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी आ. कोहळे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला.
या वेळी खा. अजय संचेती, विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आ. कृष्णा खोपडे, सुधाकरराव देशमुख, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, महामंत्री प्रभाकर येवले, प्रमोद पेंडके, संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, श्रीकांत देशपांडे, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते. निवडणूक सहप्रमुख राजेश बागडी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. आ. कृष्णा खोपडे यांनी अध्यक्षपदासाठी सुधाकर कोहळे यांचे नाव सुचविले. उपस्थित पदाधिकाऱ्यांसह मंडळ अध्यक्षांनी त्याला अनुमोदन दिले. निवडीनंतर कोहळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
मनपात रिझल्ट देऊ
- आ. कृष्णा खोपडे यांनी शहर अध्यक्ष म्हणून भाजपचा रथ बराच पुढे नेला आहे. त्यांचे काम आपणही पुढे नेऊ. पक्षसंघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन काम केले जाईल. महापालिकेच्या निवडणुका हे आपल्या समोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर या निवडणुकीतही रिझल्ट देऊ. नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवू.
- आ. सुधाकर कोहळे, नवनियुक्त शहर अध्यक्ष, भाजपा