उद्योगासंदर्भात गेल्या अडीच वर्षात काय झालं? श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करणार - मुनगंटीवार
By कमलेश वानखेडे | Published: October 31, 2022 03:39 PM2022-10-31T15:39:22+5:302022-10-31T15:48:43+5:30
प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्यावरून हवा करणे सुरू
नागपूर : काही नेते पत्रकार परिषद घेत आहेत पण कोणतेही कागद दाखवत नाही, टाटा संदर्भात कोणतेही पत्र टाटा ने सरकारला दिले आहे का? एखाद्या जागेसाठी अर्ज केला नाही, पण अशा पद्धतीने हे सरकार उद्योगाच्या बाबतीत नाकारतामक भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे. हे योग्य नाही. गेल्या अडीच वर्षात उद्योगासंदर्भात राज्यात काय झालं, या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आपण मंत्रीमंडळाच्या बैठकीत करणार आहोत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मी स्वत: उद्योग सचिवांशी चर्चा केली आहे. यपूर्वीच्या उद्योग मंत्र्यांसोबत टाटा समुहाची एखादी बैठक झाली आहे का, त्या बैठकीचे मिनिट उपलब्ध नाहीत. मात्र, प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या मुद्यावरून हवा करणे सुरू केले आहे. राज्यातील तरुणांमध्ये भ्रम निर्माण करणे सुरू आहे. गेल्या अडीच वर्षात उद्योगांसाठी किती अर्ज आले. त्यावर काय निर्णय घेतले, प्रत्यक्षात किती उद्योग सुरू झाले, किती रोजगार मिळाले याबाबत श्वेत पत्रिका काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सरकारने अनेक जनहिताचे निर्णय घेतले. राज्यात ७५ हजार पदे भरली जाणार आहेत. पोलीस विभागात २० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
कुणाचीही सुरक्षा काढण्याचे काम सरकार करीत नाही. या संदर्भात असलेली समिती आढावा घेते व त्यानंतर सचिव निर्णय घेतात. माझी सुरक्षा काढली होती, तेव्हाही मला असेच उत्तर दिले होते, असे त्यांनी सांगितले. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच सांगतील, असे सांगत त्यांनी बगल दिली.
साडेतीनशे पेक्षा जास्त वाघ
- राज्यात साडेतीनशेपेक्षा जास्त वाघ आहेत. आपण अतिशय गंभीरपणे गेल्या चार वर्षातील आकडे घेतले आहेत. वन्यजीवांच्या हल्ल्यात मनुष्यांचे मृत्यू होत आहेत. या संदर्भात चांगली व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनुष्याचे जीवन अनमोल आहे. या संदर्भातील मदतीत वाढ होत आहे. ब्रम्हपुरीच्या जंगलात ५ वाघाचे रिलोकेशन केले जात आहे. एनटीसीएने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
राणा-कडू वाद मिटला
- आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते आहेत. जनतेची सेवा करणारे सरकार आहे. अशा प्रसंगी जनतेच्या प्रश्नासंबंधी चर्चा होण्याऐवजी वैयक्तिक आरोपांवर चर्चा होणे योग्य नाही. हा वाद मिटविण्यासाठी कडू व राणा यांनी सामंजस्याची भूमिका घेतली. दोन्ही अनुभवी सदस्य राज्याच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.