नागपुरातील सिमेंट रस्त्यांवरील झाडांचा श्वास गुदमरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:22 PM2019-04-08T23:22:40+5:302019-04-08T23:26:04+5:30
सिमेंट रस्त्यावरील झाडांचा श्वास गुदमरला आहे. झाडांच्या बुडाजवळ काँक्रिटीकरण करण्यात आल्याने झाडांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात झाडे वाळण्याची तसेच कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा झाडांच्या बुडाजवळील भाग मोकळा करून त्यांना जीवदान देण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा विचार करता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याजवळील भाग मोकळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिमेंट रस्त्यावरील झाडांचा श्वास गुदमरला आहे. झाडांच्या बुडाजवळ काँक्रिटीकरण करण्यात आल्याने झाडांची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात झाडे वाळण्याची तसेच कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा झाडांच्या बुडाजवळील भाग मोकळा करून त्यांना जीवदान देण्याची गरज निर्माण झाली आहे. याचा विचार करता महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याजवळील भाग मोकळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत सिमेंट रोडमुळे झाडांना निर्माण झालेल्या धोक्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, राम जोशी, ग्रीन व्हिजील फाऊं डेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी आदी उपस्थित होते. डांबरी रस्त्यांच्या दुरुस्तीवर होणारा खर्च विचारात घेता शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात तीन टप्प्यात सिमेंट काँक्रिटचे रस्ते निर्माण केले जात आहेत. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झालेले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामे सुरू आहेत.
मात्र सिमेंटचे रस्ते करताना रस्त्यालगतच्या झाडांचा विचार करण्यात आलेला नाही. झाडांच्या बुंध्याजवळ मोकळी जागा सोडलेली नाही. काँक्रिटीकरण करण्यात आल्याने झाडांना धोका निर्माण झाला आहे. पावसाळयाच्या दिवसात वा वादळी वाऱ्यामुळे ही झाडे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चॅटर्जी यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून झाडांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे निदर्शनास आणले. झाडांच्या बुंध्याजवळील जागा तातडीने मोकळी करण्याची सूचना त्यांनी मांडली.
महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांना निर्माण झालेल्या धोका विचारात घेता त्यांनी तातडीने अशी झाडे मोकळी करण्याचे निर्देश दिले. तसेच प्रस्तावित सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे करताना झाडांच्या बुंध्याजवळ मोकळी जागा सोडून काही अंतरावर बांधकाम करण्याचे निर्देश दिले.
रस्त्यालगत झाडे लावावी
शहरातील विकास कामे करताना मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. याचा पर्यावरणावर होणारा परिणाम विचारात घेता सिमेंट काँक्रिटचे रस्ते करताना या रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्याची व ती जगविण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर द्यावी, अशी मागणी शहरातील वृक्षपे्रमी नागरिकांनी केली आहे.