सूफी गायन म्हणजे ‘खुदा’ची इबादत’; ‘नूरा सिस्टर्स’ची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:33 AM2018-08-14T11:33:24+5:302018-08-14T11:33:47+5:30
सूफी ही आमच्यासाठी केवळ गायनाची कला नाही तर आमच्यासाठी ‘खुदा’ची ‘इबादत’च आहे. हे शब्द आहेत आपल्या अनोख्या व उत्स्फूर्त गायनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘नुरा सिस्टर्स’ यांचे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सूफी ही आमच्यासाठी केवळ गायनाची कला नाही तर आमच्यासाठी ‘खुदा’ची ‘इबादत’च आहे. म्हणूनच सूफी गायन करत असताना आम्ही अक्षरश: त्यात तल्लीन होऊन जातो. हे संगीत आमच्या नसानसांमध्ये भिनले असून अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही याची सेवा करत राहू. हे शब्द आहेत आपल्या अनोख्या व उत्स्फूर्त गायनातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘नुरा सिस्टर्स’ यांचे. ज्योती नुरा व सुल्ताना नुरा या ‘नुरासिस्टर्स’ सोमवारी ‘लोकमत’तर्फे आयोजित ‘सूफी नाईट’साठी नागपुरात आल्या. यावेळी त्यांनी ‘लोकमत’समवेत विशेष संवाद साधला.
‘नूरां सिस्टर्स’चा संबंध शाम चौरसिया घराण्याशी आहे. अनेक पिढ्यांपासून आमचे कुटुंब सूफी संगीताशी जुळलेले आहे. वडील उस्ताद गुलशन मीर यांच्या अगोदर आजोबा, आई, आजी हे प्रख्यात सूफी गायक होते. अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेला कायम ठेवण्याची संधी आम्हाला मिळते आहे हे आमचे चांगले नशीबच आहे. आयुष्यभर स्वरांच्या माध्यमातून या संगीताची सेवा होत राहील, असाच आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
जगाच्या कोपऱ्यात पोहोचविणार सूफी संगीत
बदलत्या काळानुसार गीत-संगीताची पद्धतदेखील बदलत आहेत. त्यामुळेच सूफी संगीताचे काय होईल, याला कोण ऐकेल, असा प्रश्नात मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे. अनेक वर्षांपासून असे प्रश्न समोर येत आहेत. सूफी संगीत मात्र दररोज नवनवीन शिखरं गाठताना दिसून येत आहे. आतापर्यंत आम्ही देशातील अनेक मोठ्या शहरांत सादरीकरण केले आहे. सूफी संगीत ऐकण्यासाठी उत्सुक नसलेला किंवा न समजणारा आम्हाला एकाही शहरात, कार्यक्रमात आढळून आलेला नाही, अशी भावना सुल्ताना नुरा यांनी व्यक्त केली. सूफी संगीत आवडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही, तर ती वाढतच चालली आहे. हा आम्हाला मिळालेला आशीर्वादच आहे. या परंपरेला व संगीत वैभवाला चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचा व त्याला समोर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील कानाकोपऱ्यात आम्ही हे संगीत पोहोचवू असा विश्वास ज्योती नुरा यांनी व्यक्त केला.
तरुणांनादेखील आवडते सूफी संगीत
काळानुरुप गीत-संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत. गायनाचा अंदाज बदलतो आहे. तरुणाईची आवड वेगळी आहे. तसे पाहिले तर प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते. मात्र याचा अर्थ ‘पॉप’, ‘रिमिक्स’ किंवा वेगवान संगीतामुळे सूफीला धोका असे नाही. ज्यावेळी ‘खुदा’च्या ‘इबादत’चा मुद्दा असतो तेव्हा सूफी संगीतच आवडते. तरुणाईलादेखील सूफी संगीत आवडते यात शंकाच नाही. अनेक गायकदेखील हे मानतात. सूफी संगीत शाश्वत आहे, असा प्रतिपादन ज्योती नुरा यांनी केले.
तल्लीन होऊन जातो
मंचाचे आमच्या आयुष्यात मोठे स्थान आहे. ‘रेकॉर्डिंग’ करताना चुका सुधारण्याची संधी असते. मात्र मंचावर गाताना असे करता येणे शक्यच नसते. त्यामुळे मंचावर जाण्याअगोदर आम्ही आमच्या साधनेमध्ये कुठलीही कमी रहायला नको, अशीच प्रार्थना करतो. याच विचाराने आम्ही गाणे गायला सुरुवात करतो व त्यात तल्लीन होऊन जातो. सर्वकाही आपोआप ठीक होत जाते, असे सुल्ताना नुरा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
आमची जोडी नेहमी कायम राहणार
आम्ही दोघीही लहानपणापासूनच सोबत गायन करत आहोत. एकट्याला गाणे गावे लागले, असे आमच्यासोबत कधीही झाले नाही. ‘रियाज’ करताना किंवा जेवण करतानादेखील आम्ही सोबतच गाणे गातो. आयुष्यात आम्हाला एकट्याने गाणे गावे लागू शकते, असे होऊच शकत नाही. आमची जोडी नेहमी कायम राहणार व अशीच प्रार्थना आम्ही करत असतो, असे ज्योती व सुल्ताना नुरा यांनी सांगितले.