ऐन सणासुदीच्या दिवसात साखरेचा गोडवा महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:09+5:302021-08-13T04:11:09+5:30
नागपूर : श्रावण महिना आणि सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले असून ग्राहकांना फटका बसत आहे. ...
नागपूर : श्रावण महिना आणि सणासुदीचे दिवस सुरू असताना साखरेचे भाव अचानक वाढले असून ग्राहकांना फटका बसत आहे. किरकोळ विक्रीत साखरेच्या दरात किलोमागे २ रुपयांची वाढ झाली आहे. नागपुरात सध्या साखर प्रतिकिलो दर्जानुसार ३८ ते ४० रुपयादरम्यान मिळत आहे. साखर महाग झाल्याने ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी झाला आहे.
श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक सणांची मालिकाच सुरू होते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. साखरेच्या किमतीवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. दर महिन्याला साखरेचा कोटा जाहीर केला जातो. ऑगस्ट महिन्यात कोटा कमी मिळाल्याची माहिती आहे. त्यातच होलसेल व्यापाऱ्यांनीही साखरेचे भाव वाढविल्याने किरकोळमध्ये दर वाढले आहे. साखरेचे व्यापारी पंचमतिया म्हणाले, नागपुरात जाड साखर जास्त प्रमाणात विकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये जाड साखर कमी प्रमाणात तयार होत आहे. परिणामी एम व सुपर एस साखरेच्या भावात क्विंटलमागे १२० रुपयांची तफावत निर्माण झाली आहे. किमतीतील तफावत वाढण्याची शक्यता आहे.
सात महिन्यांपासून स्थिर असणारे साखरेचे भाव श्रावण महिन्यात वाढायला लागले आहेत. ठोक बाजारात भाव वाढल्याने किरकोळ बाजारातही साखरेची भाववाढ होत असून प्रतिकिलो ३८ ते ४० रुपयादरम्यान भाव झाला आहे.
श्रावणात दररोज ३ हजार क्विंटल साखरेची मागणी
साखरेचे कमिशन एजंट चंदू जैन म्हणाले, नागपुरात साखरेची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यात दररोज २ हजार क्विंटल साखर विकली जाते. सध्या मागणी वाढली असून जवळपास ३ हजार क्विंटल साखर विकली जात आहे. दिवाळीपर्यंत ही मागणी वाढत जाईल.
का वाढले भाव?
व्यापारी भवरलाल जैन म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर आणि उसाच्या घटत्या प्रमाणामुळे ऑगस्टमध्ये साखरेच्या किंमती प्रति क्विंटल १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. हंगामासाठी राज्यात साखर कारखान्यांना उसाच्या घटत्या प्रमाणाशी सामना करावा लागू शकतो. या साऱ्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर होऊ शकतो. उत्पादन घटल्यामुळे साखरेच्या किमती वाढत आहेत. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात साखरेच्या किमतीत प्रति किलो २ रुपयांची वाढ होऊन जाड साखरेचे भाव ३८ ते ४० रुपयांवर पोहोचले आहेत.
साखरेचे दर (प्रति किलो)
जानेवारी ३६
फेब्रुवारी ३७
मार्च ३६
एप्रिल ३७
मे ३७
जून ३८
जुलै ३८
ऑगस्ट ३९
महिन्याचे बजेट वाढले :
दरवर्षी श्रावण महिन्यात साखरेचे दर वाढत असतात, असा अनुभव आहे. यंदा जास्त वाढ झाली नाही. पण दोन रुपये किलोची वाढ झाल्याने फरक पडतो. साखरेपेक्षा अन्य किराणा वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने महिन्याच्या बजेटवर ताण आला आहे.
सुधा देवतळे, गृहिणी.
श्रावण महिन्यात एरवीपेक्षा साखर जास्तच लागते. यावर्षी सारखेच्या भावात फारशी भाववाढ झाली नाही. केवळ दोन वा तीन रुपयांच्या फरकाने महाग म्हणता येणार नाही. याशिवाय उपवासाच्या वस्तूंचे भाव वाढले आहे. श्रावण महिन्यात महागाई वाढतेच.
मुक्ता प्रांजळे, गृहिणी.