सरकारची काटकसर, पुरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:09+5:302021-06-03T04:07:09+5:30
नागपूर : खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे शासनाने काटकसर करीत पुरक पोषण आहारातील कोरड्या शिध्यात बदल केला आहे. त्यामुळे गेल्या काही ...
नागपूर : खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे शासनाने काटकसर करीत पुरक पोषण आहारातील कोरड्या शिध्यात बदल केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अर्धा किलो खाद्य तेलाऐवजी एक किलो साखर देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पुरक पोषण आहारातील इतर वस्तू त्याच आहेत आणि प्रथिने, कॅलरीजदेखील तितक्याच प्रमाणात आहे; पण फोडणीसाठी तेलच नसल्याने तोंडाची चव उडाली आहे.
६ महिने ते ३ वर्षे, ३ वर्षे ते ६ वर्षे, गरोदर आणि स्तनदा मातांचे आरोग्य शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहावे. बालकांना सकस आहार मिळावा आणि त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पुरक पोषण आहार दिला जातो. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे गरोदर तसेच स्तनदा मातांबरोबरच वरील वयोगटातील बालकांनाही आता वस्तू स्वरूपात शिधा दिला जात आहे. त्यात गहू, तांदूळ, मूग डाळ, हरभरा डाळ, मीठ, हळद, मिरची पावडर व खाद्यतेलाचा समावेश होता; परंतु गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली असून, सध्या १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे पोषण आहाराचे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. फोडणीविना आहार कसा घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
- दृष्टिक्षेपात
पुरक पोषण आहार योजनेचे एकूण लाभार्थी - १७८०४३
सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी - ६८६२९
३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील लाभार्थी - ८३९८०
गरोदर महिला लाभार्थी - १३४६३
स्तनदा माता - ११९७१
- शासन निर्देशानुसार वाटप
पुरक पोषण आहारात शासनाने खाद्यतेलाऐवजी साखर देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जे पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होत आहेत, ते साहित्य आम्ही लाभार्थ्यांना वाटप करीत आहोत.
भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जि.प.
- फोडणी द्यायची कशी?
लॉकडाऊनच्या कालावधीतही आम्हाला घरपोच पुरक पोषण आहाराचे साहित्य मिळत आहे; परंतु आता आम्हाला खाद्यतेलाऐवजी साखर दिली जात आहे. सध्या खाद्यतेलाचे दर १७० ते १८० रुपये किलो आहेत.
- सुनंदा माटे, लाभार्थी, पाहमी.
सरकार इतर गोष्टींवर अनावश्यक खर्च करते आणि काटकसर केवळ बालकांच्या व गरोदर मातांसाठी दिलेल्या पोषण आहारात करते. गहू, तांदळाबरोबर डाळी आणि तिखट, मीठसुद्धा दिले. तेलाऐवजी साखर देऊन फोडणीचा वांदा केला आहे.
-सविता सातपुते, लाभार्थी, मेंढला.