ऑटो स्टॅन्डसाठी जागा सूचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:09 AM2021-03-10T04:09:29+5:302021-03-10T04:09:29+5:30
मनपा वाहतूक विभागाचे आवाहन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांना ...
मनपा वाहतूक विभागाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी अवैध पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. याचा विचार करता मनपाच्या वाहतूक विभागाने शहरातील ऑटो संघटनांना शहरात अधिकृत ऑटो स्टॅन्ड तयार करण्यासाठी योग्य जागा सुचविण्याचे आवाहन केले आहे.
जागा सुचविल्यानंतर त्याची नागरी संघटना, वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅपोरेशनमार्फत प्रस्तावित स्थळांची नियमाप्रमाणे छाननी करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. जे विद्यमान काही ऑटो स्टॅन्ड आहेत ते योग्य जागी नसल्याने त्याचे स्थान बदलण्यावरसुद्धा प्रशासनातर्फे विचार केला जाईल, अशी माहिती वाहतूक अभियंता श्रीकांत देशपांडे यांनी दिली. सध्या नागपुरात २५५ ऑटो स्टॅन्ड आहेत. नवीन वसाहतीमध्ये ऑटो स्टॅन्डची मागणी संघटनांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे केली आहे.