आत्महत्या केलेल्या रागिणीला ७८ टक्के गुण
By admin | Published: May 30, 2017 05:47 PM2017-05-30T17:47:30+5:302017-05-30T17:47:30+5:30
१२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत.
आॅनलाईन लोकमत
वणी(यवतमाळ) : १२ वीचे पेपर खराब गेल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणाऱ्या वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला ६५० पैकी ५०४ गुण (७७.५४ टक्के) गुण प्राप्त झाले आहेत.
उत्तम नर्तकी असलेली रागिणी नारायण गोडे ही येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती. १० वीच्या परीक्षेत तिने ९२.२० टक्के गुण प्राप्त केले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात १२ वीची परीक्षा झाल्यानंतर पेपर खराब गेल्यामुळे रागिणी निराश झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असलेले तिचे वडील नारायण गोडे, आई सुमित्रा आणि तुषार व हितेश या भावंडांनी तिची समजुतही काढली. मात्र ती त्यानंतरही तणावातच वावरत होती. तिला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तिने नागपूर येथील एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेशही घेतला होता. दरम्यान, तिची बिघडलेली मानसिक स्थिती पाहून वडिल नारायण गोडे यांनी तिला उपचारासाठी यवतमाळ येथे नेले. उपचार घेतल्यानंतर वातावरणात बदल म्हणून तिला बाभूळगाव तालुक्यातील वाई (झोला) येथे मामाच्या गावाला नेण्यात आले. मात्र १४ मार्चच्या सकाळी तिने मामाच्याच घरी विष प्राशन करून आत्महत्या केली.
नृत्यात पारंगत असलेल्या रागिणीची ही अकाली एक्झीट रसिक मनाला चटका लावून गेली. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाऊन रागिणीने नृत्याच्या मैफीली गाजविल्या होत्या. त्यातून शेकडो पुरस्कारही तिने पटकाविले होते. मंगळवारी १२ वीचा निकाल जाहीर झाला. अनेकांनी उत्सुकतेपोटी रागिणीचा निकाल तपासला. तिला ७८ टक्के गुण मिळाल्याचे कळताच, सर्वांनाच धक्का बसला, आपण नापास होऊ या केवळ भीतीपोटी रागिणीने जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.