पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: April 16, 2015 02:07 AM2015-04-16T02:07:10+5:302015-04-16T02:07:10+5:30
घरफोडीच्या अट्टल गुन्हेगाराने शहर गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्येचा
नागपूर : घरफोडीच्या अट्टल गुन्हेगाराने शहर गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी १.२० वाजता घडलेल्या या घटनेने शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
प्रवीण ऊर्फ पप्पू देवराव वंजारी (२८) , असे या आरोपीचे नाव आहे. तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथे प्रवीण बागडेच्या घरी भाड्याने राहतो. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहर गुन्हे शाखेचे चार्ली कमांडो रामेश्वरी, शताब्दी चौक भागात गुन्हेगारांचा शोध घेत असताना त्यांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास शताब्दी चौक भागात प्रवीण वंजारी गवसला. लागलीच कमांडोजनी त्याला ताब्यात घेऊन शहर गुन्हे शाखा कार्यालयात नेले. चौकशी करून त्याला येथीलच कोठडीत ठेवण्यात आले. दुपारच्या वेळी त्याने पिण्यास पाणी मागून खिशातून ब्लेडचा तुकडा काढून स्वत:च्या गळ्यावर दोन चिरे मारून घेतले.
रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. कमांडो हेड कॉन्स्टेबल अनुप लोहारे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी प्रवीण वंजारीविरुद्ध भादंविच्या ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.