हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 11:45 PM2020-08-04T23:45:43+5:302020-08-04T23:47:07+5:30
हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोली पोलिसांच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्णत्वास जात नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. धंतोली पोलिसांच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. गौरी सुनील धुमाळ (वय १९) असे या तरुणीचे नाव असून ती धंतोलीतील शांती कुटीरमध्ये राहत होती.
गौरीचे वडील सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून आई गृहिणी आहे. गौरी हिने एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेतले होते. हवाईसुंदरी होण्याची तिची महत्त्वाकांक्षा होती. त्या संबंधाने आवश्यक ते सर्व प्रयत्न ती करीत होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ती शिकत होती. दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण करून अनेक दिवस झाले तरी हवाईसुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे गौरीला नैराश्य आले होते. सोमवारी गौरीचे आईवडील तिच्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यामुळे ती घरात एकटीच होती. संध्याकाळी ७ च्या सुमारास आईवडील घरी आले तेव्हा ती ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून दिसली. आई-वडिलांनी आरडाओरड केल्यामुळे शेजारी गोळा झाले. डॉक्टरांना बोलविले तोपर्यंत ती मृत झाली होती. गौरीची आई कुमुद स्वप्निल धुमाळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांची टाळाटाळ
या प्रकरणात माहिती घेण्यासाठी धंतोली पोलिस ठाण्यात विविध पत्रकारांनी सकाळपासून प्रयत्न केले. मात्र पोलिस ठाण्यातील मंडळी या संबंधाने माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. आत्महत्येचे कारण काय, तरुणी काय करत होती, त्या संबंधीची माहितीही पोलिसांनी रात्रीपर्यंत दिली नाही. पोलिसांची टाळाटाळ कशासाठी होती, ते कळायला मार्ग नाही.