रडत-रडत बोलताना व्यावसायिकाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2023 20:44 IST2023-06-17T20:44:10+5:302023-06-17T20:44:59+5:30
Nagpur News रडत-रडत मोबाइलवर बोलत असताना एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून रेल्वे लाईनच्या मध्यभागी उडी घेऊन आत्महत्या केली.

रडत-रडत बोलताना व्यावसायिकाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या
नागपूर : रडत-रडत मोबाइलवर बोलत असताना एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून रेल्वे लाईनच्या मध्यभागी उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी १६ जूनला रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कोराडी ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक कलोडे यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. लालचंद रामफेर गुप्ता (वय २६, रा. शाहू किराणा जवळ, ताजनगर झोपडपट्टी, मानकापूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो फळ विक्रीचा व्यवसाय करीत होता. घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार लालचंदने शुक्रवारी रात्री ११ वाजता कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सावनेर नागपूर हायवेवरील ओव्हर ब्रीजवर आपली टाटा एस गाडी उभी केली आणि पुलावरून खाली रेल्वे लाईनच्या मध्यभागी उडी घेतली. उडी घेण्यापूर्वी तो मोबाइलवर कोणाशी तरी रडत-रडत बोलत होता. तो जखमी झाल्यामुळे पोलिसांनी त्याला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
.............