पलंग, सोफ्याला केबल बांधून घेतला गळफास; आत्महत्या की घातपात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 09:40 PM2022-04-13T21:40:17+5:302022-04-13T21:40:50+5:30
Nagpur News पलंग आणि सोफ्याला केबल बांधून गळफास घेतल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत धाडीवाल ले-आऊटच्या गल्ली नं. ३ मध्ये घडली आहे. विचित्र पद्धतीने घेतलेल्या या फाशीबद्दल पोलिसांनीही शंका व्यक्त करून तपास सुरू केला आहे.
नागपूर : पलंग आणि सोफ्याला केबल बांधून गळफास घेतल्याची घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत धाडीवाल ले-आऊटच्या गल्ली नं. ३ मध्ये घडली आहे. विचित्र पद्धतीने घेतलेल्या या फाशीबद्दल पोलिसांनीही शंका व्यक्त करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडीवाल ले-आऊट गल्ली नं. ३ येथे सिद्धार्थ गायकवाड यांचे कुटुंब राहते. कुटुंबात वडील सिद्धार्थ जयराम गायकवाड (वय ५५), पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले. मुलगा प्रणय गायकवाड आपल्या मित्राच्या लग्नासाठी डोंगरगावला गेला होता. तो रात्री उशिरा परत आला. सिद्धार्थ गायकवाड यांनी ज्या पद्धतीने फाशी घेतली, त्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृतक सिद्धार्थ गायकवाड समोरच्या खोलीत झोपले होते. त्यांनी केबल गळ्यात टाकून त्याचे एक टोक पलंगाला आणि दुसरे टोक सोफ्याला बांधले. त्यांनी कशी फाशी घेतली, हे समजण्यापलीकडचे आहे. कुटुंबीयांच्या मते ते सकाळी उठले असता सिद्धार्थ गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी ठसे तज्ज्ञ आणि फोटोग्राफरला बोलावले. मृतकाच्या मुलाचीही पोलिसांनी चौकशी केली. अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
............