नागपूरच्या मौदा भागात शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 07:45 PM2017-11-20T19:45:42+5:302017-11-20T19:52:43+5:30
तालुक्यातील बारशी येथील धान उत्पादक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
आॅनलाईन लोकमत
मौदा : तालुक्यातील बारशी येथील धान उत्पादक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्या शेतकऱ्याकडे एक लाख रुपयांचे पीककर्ज थकीत असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.
माणिक रामजी हिवसे (४५, रा. बारशी, ता. मौदा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. माणिक हिवसे यांच्याकडे बारशी शिवारात साडेनऊ एकर शेती आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी बँक आॅफ इंडियाच्या चाचेर शाखेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मागील वर्षी समाधानकारक पीक हाती न आल्याने त्यांना या कर्जाची परतफेड करणे जमले नाही. या वर्षी त्यांनी धानाची रोवणी केली होती. धानावर सुरुवातीला कडाकरपा आणि नंतर तुडतुड्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यातच अपुरा पाऊस आणि ऐनवेळी पेंच प्रकल्पाचे ओलितासाठी न सोडलेले पाणी यामुळे धानाच्या उत्पादनात घट येणार असल्याने ते चिंतीत होते.
दरम्यान, त्यांनी सायंकाळच्या सुमारास शेतातच कीटकनाशक प्राशन केले. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता, ते शेतात पडून असल्याचे आढळून आले. त्यांना लगेच नजीकच्या शासकीय रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. सोमवारी दुपारी मौदा येथे उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.