फुटाळ्यावर ‘सुसाईड ड्रामा’
By admin | Published: January 13, 2016 03:23 AM2016-01-13T03:23:03+5:302016-01-13T03:23:03+5:30
कर्जदारांच्या तगाद्यामुळे एका व्यावसायिकाने फुटाळा तलाव गाठला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या व्यावसायिकाचे वकील मित्र ठाण्यात पोहोचले.
कर्जमाफीसाठी शक्कल : पोलिसांनी दिली समज
नागपूर : कर्जदारांच्या तगाद्यामुळे एका व्यावसायिकाने फुटाळा तलाव गाठला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या व्यावसायिकाचे वकील मित्र ठाण्यात पोहोचले. तेथे कर्जदारांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तब्बल दोन तास ‘सुसाईड ड्रामा’ चालला. नंतर प्रकरण अंगलट येण्याचे संकेत मिळाल्याने व्यावसायिक आणि त्याच्या मित्रांनी पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला.
घटना सकाळी ११ पासून सुरू झाली. बऱ्याच वेळेपासून एक व्यक्ती फुटाळा तलावाच्या काठावर बसला होता. त्याच्या एकूणच हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर अनेकांनी नजर रोखली. त्याने काठावरून उडी मारताच मासेमारी करणाऱ्यांनी लगेच त्याला बाहेर काढले. माहिती कळाल्याने अंबाझरी पोलिसांनी त्याला फुटाळ्यावरून ठाण्यात आणले. तेथे त्याची चौकशी केल्यानंतर कर्जदारांच्या तगाद्यामुळे आपण आत्महत्या करीत होतो, असे त्याने सांगितले. लगेच त्याचे काही वकील मित्र पोहोचले. त्यांनीही आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी चौकशी केली असता, कर्ज चुकविण्यासाठी हा ‘सुसाईड ड्रामा’ घडवून आणल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी ‘त्याला’ झापले आणि घराकडे पाठविले. संबंधित व्यक्तीवर लाखोंचे कर्ज असल्याची माहिती असून, कर्जमाफी मिळविण्यासाठीच त्याने हा प्रकार घडवून आणल्याची जोरदार चर्चा आहे.(प्रतिनिधी)