उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:23+5:302021-05-15T04:08:23+5:30
कारण गुलदस्त्यात : पुढच्या महिन्यात होते लग्न लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हुडकेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणीसह तिघांनी आत्महत्या केली. ...
कारण गुलदस्त्यात : पुढच्या महिन्यात होते लग्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील एका उच्चशिक्षित तरुणीसह तिघांनी आत्महत्या केली. तरुणीचे नाव निकिता युवराज खापेकर (वय ३२) आहे. ती हुडकेश्वरच्या लक्ष्मणनगरात राहात होती. एमबीए झालेली निकिता पुण्याच्या एका आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तिचे काही दिवसांपूर्वीच लग्न जुळले होते आणि जूनमध्ये लग्न समारंभ पार पडणार होता. निकिताला वडील नसून तिची आई रेल्वेत नोकरीला आहे.
निकिता तिच्या करिअरच्या अनुषंगाने काही दिवसांपासून चिंतित होती. तिच्या नातेवाइकांजवळ करिअरबाबत ती सतत चिंता व्यक्त करायची. या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी सकाळी १०.४५ झाले तरी ती तिच्या रूम बाहेर आली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिला आवाज दिला. नंतर आईने निकिताचे ज्याच्यासोबत लग्न जुळले आहे त्यालासुद्धा बोलवून घेतले. त्यांनी दार तोडून बघितले असता निकिता आतमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. तिला त्यांनी खाली उतरवले आणि पोलिसांना माहिती दिली. हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निकिताच्या रूममध्ये तपासणी केली. तिच्या मोबाइलचीही पाहणी केली. मात्र सुसाइड नोट अथवा दुसरे काहीही आढळले नाही. दरम्यान, निकिताने आत्महत्या का केली, हे स्पष्ट झाले नसून मंजू राजकुमार वेळेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
---
तरुणाने लावला गळफास
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौतमनगर भिवसन खोरीमध्ये राहणारा महेश जियालाल महतो (वय २५) याने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. सुरेश मोतीलाल महतो यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
--
विष पिऊन आत्महत्या
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेताजी नगरात राहणारे प्रफुल्ल अर्जुन धांडे (वय ३२) यांनी ४ मेच्या रात्री विष पिले होते. उपचारासाठी त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे १२ मेच्या पहाटे डॉक्टरांनी धांडे यांना मृत घोषित केले. शिशुपाल फत्तुजी बांडेबुचे (रा. पारडी) यांनी दिलेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
--