आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला राखी घेऊन रामगिरीवर धडकल्या
By admin | Published: August 30, 2015 02:46 AM2015-08-30T02:46:33+5:302015-08-30T02:46:33+5:30
राखी पौर्णिमेनिमित्त थेट मुख्यमंत्र्यांनाच राखी बांधून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन द्यावे आणि भावाच्या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्या, ...
प्रहारच्या आंदोलनाने वेधले लक्ष : मुख्यमंंत्री नसल्याने पालकमंत्र्यांनाच बांधली राखी
नागपूर : राखी पौर्णिमेनिमित्त थेट मुख्यमंत्र्यांनाच राखी बांधून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन द्यावे आणि भावाच्या नात्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या मागण्या मान्य कराव्या, या उद्देशाने आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलांसह हजारो महिलांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थानी रामगिरीवर धडक दिली. तब्बल दोन तास महिला रामगिरीवर ठाण मांडून होत्या.
परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात नसल्याने त्यांनी ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महिलांच्या भेटीसाठी पाठविले. बावनकुळे यांनी महिलांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा संदेश वाचून दाखविला. तसेच मागण्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मुंबई बैठक बेलाविल्याचे जाहीर केले. यानंतर महिलांनी पालकमंत्र्यांनाच राखी बांधून आपल्या आंदोलनाची सांगता केली.
आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला, विधवा, परितक्त्या, निराधार, भूमिहीन मजूर महिला, एकल, पुनर्वसित व शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन प्रहार या संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शनिवारी ‘मुख्यमंत्र्यांना राखी बांधू’ हे आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. विशेषत: अमरावतीसह विदर्भातील विविध भागातील महिला मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी रामगिरीवर आल्या होत्या.
राज्या सरकारने शिफारस केलेल्या व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावामधील तफावत रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून देण्यात यावी, शेतातील पेरणी ते कापणीपर्यंतची कामे रोजगार हमी योजनेद्वारे करण्यात यावी, अन्न व सुरक्षा योजनेत सुटलेले मजूर, शेतकरी आत्महत्याग्रस्त, परितक्त्या, निरधार, भूमिहीन, अपंग व पुनर्वसित महिलांना समाविष्ट करावे, विधवा, परितक्त्या, निराधार, भूमिहीन, अपंग (एकल) महिलांकरिता वित्त महामंडळ स्थापन करण्यात यावे, सदर महिलांना दारिद्र्यरेषेची अट न लावता घरकुल योजना मंजूर करण्यात यावी. सदर महिलांना दोन हजार रुपये मासिक पेन्शन मिळावी, एकल महिलांची न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने निकाली काढावी, शेतकऱ्यांना दोन रुपये किलोने धान्य देण्याऐवजी रोख रक्कम द्यावी, राज्यातील पूरग्रस्त पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले.
आ. बच्चू कडू, ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधिया, किसान मित्र संघटनेचे डॉ. मधुकर गुंबळे, एकल महिला संघटनेच्या संयोजिका बेबीताई वाघ व मंदा आलोने यांच्या नेतृत्वात दुपारी ३ वाजता आमदार निवास येथून महिलांनी रामगिरीवर मोर्चा काढला.
तब्बल दोन तास महिला रामगिरीवर ठाण मांडून होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नागपुरात नव्हते. ते एका कार्यक्रमासाठी अहमदनगरला गेले होते.
त्यामुळे त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना महिलांच्या भेटीसाठी पाठविले. (प्रतिनिधी)
मागण्यांसदर्भात मंगळवारी मुंबईत बैठक
पालकमंत्री महिलांच्या भेटीसाठी आले. परंतु महिला ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी पालकमंत्र्यांनी मुख्यमंंत्र्यांनी मोबाईलवर पाठविलेला मॅसेज वाचून दाखविला. त्यात महिलांच्या मागण्यासंदर्भात येत्या मंगळवारी मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात आ. बच्चू कडू यांच्यासह महिला प्रतिनिधींंनाही आमंत्रित करण्यात आल्याचे जाहीर केले. दरम्यान आ. कडू यांनी ऊर्जामंत्र्यांकडे विधवा महिलांसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावरही पालकमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले. यानंतर महिलांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना राखी बांधली आणि आंदोलनाची सांगता झाली.