नागपुरात शवविच्छेदनगृहाच्या इमारतीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 01:00 AM2020-06-18T01:00:10+5:302020-06-18T01:06:30+5:30
गेल्या २४ तासात एका महिलेसह ६ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटना हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या २४ तासात एका महिलेसह ६ जणांनी गळफास लावून आत्महत्या केली. या घटना हुडकेश्वर, पारडी, यशोधरानगर, हिंगणा, अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या.
पहिली घटना हुडकेश्वर हद्दीत घडली. जानकीनगर येथील अस्मिता पंकज भरजे (२६) यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. दुसरी घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमाननगर भांडेवाडी येथे घडली. येथे राहणारा सुदेश दुर्गाप्रसाद खोब्रागडे (२९) याने राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला. तिसरी घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचवटीनगर येथे घडली. येथील संजय सदाशिव वासनिक (५०) यांनी गळफास लावूून आत्महत्या केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडव घोराड येथील रहिवासी तुळशीदास शालिकराव उकीनकर (३०) यांनी आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. तालुक्यातील मेटाउमरी खदान येथील वासू गुरू नैताम (४४) यांनी घराच्या बाहेरील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या दोन्ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आल्या. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मेडिकलच्या शवविच्छेदन गृहाच्या नवीन इमारतीत आत्महत्या
अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील मेडिकल हॉस्पिटलच्या शवविच्छेदनगृहाच्या नवीन इमारतीच्या लोखंडी ग्रीलला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास लावून ३५ वर्ष वयोगटातील एका इसमाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उजेडात आली.
विषारी औषध पिऊन आत्महत्या
इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग, मोठ्या विहिरीजवळ राहणारे शंकर रामभाऊ परचाके (४८) यांनी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये भरती केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.