आईची दोन मुलांसह आत्महत्या
By admin | Published: May 18, 2015 02:29 AM2015-05-18T02:29:25+5:302015-05-18T02:29:25+5:30
कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला.
विहिरीत घेतली उडी : हिवराबाजार येथील घटना
देवलापार : कौटुंबिक कलहातून आईने दोन मुलांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार येथे रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रीती कवडू वासनिक (२५, रा. हिवराबाजार, ता. रामटेक) असे मृत आईचे तर शंतनू (७) आणि सिद्धांत (४) अशी मृत मुलांची नावे आहेत. कवडू वासनिक (४५) याला पहिल्या पत्नीपासून अपत्य नसल्याने त्याने तिच्या संमतीने २०१० मध्ये प्रीतीशी विवाह केला. प्रीतीचाही हा दुसरा विवाह होता. तिला पहिल्या घरचा शंतनू हा मुलगा असून, शाळेत त्याचे नाव शंतनू कवडू वासनिक असे आहे. त्यानंतर सिद्धांतचा जन्म झाला. दरम्यान, या दोघींमध्ये खटके उडायला सुरुवात झाली.
कवडूच्या पहिल्या पत्नीला रविवारी सकाळी भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे जावयाचे होते. त्यामुळे कवडूने तिच्यासाठी चहा तयार केला होता. ती घरून निघून गेल्यानंतर कवडू व प्रीतीमध्ये याच कारणावरून भांडण झाले. कवडूने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कवडूने त्याच्या पहिल्या पत्नीशी बोलू नये, असा हट्ट धरला होता. तो किराणा दुकानातील साहित्य खरेदी करण्यासाठी दुपारी घराबाहेर पडला. तो मध्यंतरी घरी परल्यानंतर शंतनू व सिद्धांत दोघेही घराबाहेर खेळत होते. प्रीती डॉक्टरकडे गेल्याचे मुलांनी त्याला सांगितले. त्यानंतर तो दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुन्हा घरी आला. त्यावेळी मुले घरी नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने चौकशी केली असता, कुणाला काहीही माहिती नव्हते. दरम्यान, हिवराबाजार - फुलझरी रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रांत बागडे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोन्ही मुलांच्या चपला आढळून आल्या. संशय आल्याने बागडे यांनी विहिरीत डोकवले असता, सिद्धांतचा मृतदेह तरंगताना आढळून आला. काही वेळातच प्रीतीने दोन माुलांसह विहिरीत उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)