नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:37+5:302021-03-23T04:08:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नववीच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीत रविवारी रात्री ...

Suicide of a ninth grader | नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नववीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नववीच्या विद्यार्थ्याने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नंदनवन पोलिसांच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. सर्वेश सचिन माकडे (वय १४) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

सर्वेशचे वडील सचिन माकडे भूलतज्ज्ञ (डॉक्टर) असून, आई दंतचिकित्सक आहे. त्याला १० वर्षांची एक छोटी बहीण आहे. नंदनवनमधील रमना मारुती नगरात डॉ. माकडे यांचे तीन माळ्याचे निवासस्थान आहे. त्यांची कुही येथे शेती आहे. रविवारी माकडे दाम्पत्य शेती बघायला गेले होते. घरी सर्वेश, त्याची छोटी बहीण, आजी आणि आजोबा होते. सायंकाळी सर्वेश आणि त्याची बहीण तिसर्‍या माळ्यावर गेले. तेथे सर्वेश बराच वेळपर्यंत लॅपटॉप बघत होता. नंतर दोघे बहीण - भाऊ खेळू लागले. त्यानंतर काय झाले कळायला मार्ग नाही. सर्वेश बाथरूममध्ये गेला आणि त्याने ड्रायव्हरच्या हँडलला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. तो बाथरूममध्ये गेल्यानंतर छोटी बहीण खाली आली आणि आजी - आजोबांजवळ थांबली. दरम्यान, सायंकाळी शेती बघून माकडे दाम्पत्य नागपुरात परतले. जगनाडे चौकातील एका खासगी इस्पितळात डॉ. माकडे निघून गेले, तर सर्वेशची आई घरी परतली. नववीत शिकणाऱ्या सर्वेशचा रोज सायंकाळी ६.३०ला ऑनलाईन क्लास असायचा. तो क्लासला बसला की नाही, ते बघण्यासाठी आई तिसर्‍या माळ्यावर गेली. सर्वेश रूममध्ये दिसत नसल्यामुळे त्यांनी बाथरूमकडे जाऊन बघितले असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत दिसला. सर्वेशच्या आईने लगेच त्याच्या वडिलांना फोन करून घरी बोलवून घेतले. त्यानंतर माकडे घरी परतले. त्यांनी सर्वेशला खाली उतरवून बराच वेळपर्यंत प्रथमोपचार केले. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे जगनाडे चौकातील खासगी इस्पितळात नेले. तेथे त्याला व्हेंटिलेटर लावून उपचार करण्यात आले. सर्वेशकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे डॉक्टरांनी रात्री ८.३० च्या सुमारास त्याला मृत घोषित केले. ही माहिती कळताच नंदनवनचे ठाणेदार शेख मुक्तार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्वेशच्या आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी रुमची तपासणी केली. आई-वडिलांना आत्महत्येचे कारण विचारले. त्यांच्या माहितीनुसार, सर्वेश अभ्यासात थोडा कच्चा होता. मात्र, वेगवेगळ्या प्रकारच्या खेळात त्याला इंटरेस्ट होता. त्याच्याकडे लॅपटॉप होता. ऑनलाईन क्लाससाठी तो त्याचा वापर करायचा. गरज पडल्यास आई-वडिलांचा मोबाईल वापरायचा. त्याच्याकडे स्वतंत्र मोबाईल नव्हता आणि त्याची काही तशी मागणीही नव्हती.

---

कारण गुलदस्त्यात

या प्रकरणात पब्जीचा अँगल आहे का, त्याचीही पोलिसांनी तपासणी केली. मात्र, त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेश फारसा मोबाईलवर गुंतून राहात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वेशची आत्महत्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्याने अभ्यासाच्या दडपणामुळे आत्महत्या केली, की कोणत्या गेममुळे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---

Web Title: Suicide of a ninth grader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.