व्हीएनआयटीतील बीटेक विद्यार्थ्याची आत्महत्या
By योगेश पांडे | Published: May 30, 2024 06:09 PM2024-05-30T18:09:40+5:302024-05-30T18:09:55+5:30
दिव्यांशू गौतम असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो ‘सीएसई’ (कॉम्प्युटर सायन्स ॲंड इंजिनिअरींग) च्या अंतिम वर्षात शिकत होता.
नागपूर : व्हीएनआयटीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. संबंधित विद्यार्थी बी.टेक.च्या अंतिम वर्षाला होता. त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.
दिव्यांशू गौतम असे मृतक विद्यार्थ्याचे नाव असून तो ‘सीएसई’ (कॉम्प्युटर सायन्स ॲंड इंजिनिअरींग) च्या अंतिम वर्षात शिकत होता. तो मुळचा बिहारमधील पुर्णिया जिल्ह्यातील होता व तो महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपासून तो न दिसल्याने त्याचे सहकारी खोलीजवळ गेले. तेथे दुर्गंध येत असल्याने त्यांनी व्हीएनआयटीतील अधिकाऱ्यांना माहिती दिली.
दरवाजा उघडला असता दिव्यांशू जमिनीवर अचेतन अवस्थेत पडला होता. लगेच पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दिव्यांशूचा मृतदेह मेडिकल रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेची त्याच्या कुटुंबियांनादेखील माहिती देण्यात आली आहे. दिव्यांशूने दोन दिवसांअगोदर आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.