नागपुरात पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:15 PM2019-05-30T12:15:03+5:302019-05-30T12:15:50+5:30
प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस शिपायाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत हिंगणा रोड येथे घडली. पोलिसानुसार कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, तर ते ठाणेदाराविरुद्ध त्रस्त असल्याचेही बोलले जात आहे.
विकास नीळकंठ गुडधे रा. गेडाम ले-आऊट हिंगणा रोड असे मृत शिपायाचे नाव आहे. विकास पूर्वी सैन्यात होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना पोलिसात नोकरी मिळाली. काही दिवस मुख्यालयात राहिल्यानंतर तीन वर्षांपूर्वी त्यांना प्रतापनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली. एमआयडीसी पोलिसानुसार दुपारी २.३० वाजता विकास घरी आले. त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती तर आई व भाऊ दुसऱ्या खोलीत आराम करीत होते. सायंकाळी ६ वाजता पत्नी घरी परतली. तेव्हा त्यांना विकास छताच्या पंख्याला फासावर लटकून होते. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आई व भाऊ आले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विकासचा मृत्यू झाला होता. पोलिसांना सूचना देण्यात आली.
एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पोस्टमार्टमकरिता रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक चौकशीत विकासला दारूचे व्यसन होते. तो कौटुंबिक तणावात असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.