आर्थिक कोंडीमुळे नागपुरात कापड व्यावसायिकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:06 PM2020-04-28T12:06:19+5:302020-04-28T12:07:41+5:30
आर्थिक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला घरगुती वाद याला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात सोमवारी सकाळी ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला घरगुती वाद याला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. प्रकाश वालुसा सेलोकर (वय ४०) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. सेलोकर हे वैद्य यांच्या घरी भाड्याने राहत होते. ते काही दिवसांपूर्वीपर्यंत कापडाचा व्यवसाय करायचे. लॉकडाऊनमुळे बहुतांश दुकाने, व्यवसाय बंद पडल्याने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. सेलोकर यांचेही असेच झाले होते. उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांनी भाजी विकणे सुरू केले. मात्र त्यातून तुटपुंजी मिळकत होत होती. परिणामी त्यांच्या घरात वाद वाढला. यामुळे त्यांची पत्नी स्नेहल तिच्या नंदनवनमधीलच माहेरी निघून गेली. पाच दिवसांपासून प्रकाश आणि त्यांचे ९० वर्षीय वृद्ध वडील असे दोघेच घरी राहत होते. पत्नी रागाने निघून गेल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचेही वांधे झाले होते. परिणामी प्रकाश यांची मानसिक अवस्था बिघडली. त्यांनी आज सकाळी १० च्या सुमारास सिलिंगच्या हूकला गळफास लावून आत्महत्या केली. वृद्ध वडिलांना हा प्रकार दिसताच त्यांनी हंबरडा फोडला. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावली. प्रकाश यांना खाली उतरविण्यात आले. ते कसलीही हालचाल करीत नसल्याने शेजारच्यांनी नंदनवन पोलिसांना कळविले. नंदनवन पोलिसांनी लगेच प्रकाश यांना मेडिकलमध्ये नेले. तेथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे धन्वंतरी नगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तीन दिवसांत दुसरी घटना
कोरोना महामारीने अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावून घेतला आहे. त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे छोटा मोठा धंदा करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या अनेकांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडाली आहे.
तीन दिवसांपूर्वी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंपनीत सेल्समॅन म्हणून कार्यरत असलेल्या रितेश रामटेके याने पत्नी माहेरी गेल्याचे पाहून गळफास लावून घेतला. तर आता नंदनवनमध्ये ही घटना घडली.