‘ऑफलाईन’ परीक्षा घेतल्या तर आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:57 PM2020-12-14T23:57:02+5:302020-12-15T00:03:31+5:30
Offline Exam, nagpur news राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ‘ऑनलाईन’, ‘ऑफलाईन’ किंवा दोन्ही प्रकारे घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचा ‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध आहे. काही विद्यार्थ्यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली असून, चक्क अशी परीक्षा घेतली तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील ‘एटीकेटी’च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ‘ऑनलाईन’, ‘ऑफलाईन’ किंवा दोन्ही प्रकारे घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांचा ‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध आहे. काही विद्यार्थ्यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली असून, चक्क अशी परीक्षा घेतली तर आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. काही अधिकाऱ्यांना त्यांनी असे ‘एसएमएस’ पाठविल्याने विद्यापीठात खळबळ उडाली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्रातील परीक्षा बाकी आहेत. ‘एटीकेटी’ घेतलेल्या या विद्यार्थ्यांचे लक्ष विद्यापीठाकडे लागले आहे. संबंधित परीक्षा लवकरच घेण्याचे संकेत विद्यापीठाने दिले होते. या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन आणि ’मिक्स मोड’ अशा तीन प्रकारात घेण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र विद्यार्थ्यांनी ‘ऑफलाईन’ परीक्षेला विरोध केला आहे. जर ‘ऑफलाईन’ परीक्षा घेतली तर आत्महत्या करू, अशा आशयाचे ‘एसएमएस’ शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यासह विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहेत. यामुळे अधिकाऱ्यांना घाम फुटला आहे.
भंडारा-गोंदियातील विद्यार्थ्यांचादेखील समावेश
‘लोकमत’ला मिळालेल्या ‘एसएमएस’च्या ‘कॉपी’मध्ये विद्यार्थ्यांनी चक्क त्यांचे नाव व जिल्हादेखील लिहिलेले आहेत. अधिकाऱ्यांना संदेश पाठविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भंडारा-गोंदियातील विद्यार्थ्यांचादेखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘ऑफलाईन’बाबत निर्णय झालाच नाही
यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांच्याशी रात्री उशिरा संपर्क झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना असे ‘एसएमएस’ आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. विद्यापीठाने अद्याप परीक्षांबाबत काहीही घोषणा केलेली नाही. ‘ऑफलाईन’ परीक्षांबाबत ठोस निर्णय तर झालेलाच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अफवांना बळी पडू नये व विद्यापीठाच्या घोषणेची प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन डॉ. साबळे यांनी केले.