तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:14 AM2021-08-17T04:14:05+5:302021-08-17T04:14:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : पावसाअभावी माेसंबीची २०० झाडांची बाग वाळल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : पावसाअभावी माेसंबीची २०० झाडांची बाग वाळल्याने हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रानवाडी येथे साेमवारी (दि. १६) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली.
महेश हेमराज बेहनिया (२७, रा. रानवाडी, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या निधनानंतर महेश कुटुंबाची जबाबदारी सांभाळायचा व शेती करून उदरनिर्वाह करायचा. सततच्या नापिकीमुळे ताे हवालदील झाला हाेता. त्याने शेतात २०० झाडांची माेसंबीची बाग तयार केली हाेती. त्यात पंधरवड्यापासून पावसाने दडी मारली आणि माेसंबीची छाेटी झाडे सुकायला सुरुवात झाली.
या प्रकारामुळे महेश हताश झाला. त्यातच त्याने साेमवारी सकाळी शेतात कुणीही नसताना विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. त्याच्या श्चात आई, बहीण व दाेन भाऊ आहेत. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, तपास बीट जमादार प्रज्योग तायडे करीत आहेत.
..
महिनाभरातील तिसरी घटना
जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येची ही महिनाभरातील तिसरी घटना आहे. यापूर्वी चांदणीबर्डी व घाेगरा येथील तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तरुण शेतकऱ्यांना शेती करताना नैराश्य येत असल्याने तसेच त्यातून ते आत्महत्या करण्याचे टाेकाचे पाऊल उचलत आहे. मात्र, सरकार व प्रशासन या आत्महत्या थांबविण्यासाठी काहीही उपाययाेजना करायला तयार नाहीत.