नागपुरातील खामल्यात व्यापाऱ्याची दुकानात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 11:44 PM2018-10-29T23:44:31+5:302018-10-29T23:45:59+5:30
खामल्यातील एका रेडिमेड कापड विक्रेत्याने दुकान बंद करून आतमध्ये गळफास लावून घेतला. सुधीरकुमार दयाराम बत्रा (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आर्थिक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बत्रा यांनी हे आत्मघाती कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खामल्यातील एका रेडिमेड कापड विक्रेत्याने दुकान बंद करून आतमध्ये गळफास लावून घेतला. सुधीरकुमार दयाराम बत्रा (वय ४६) असे आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे झालेल्या आर्थिक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बत्रा यांनी हे आत्मघाती कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
मूळचे जळगाव येथील रहिवासी असलेले बत्रा काही वर्षांपूर्वी नागपुरात आले होते. त्यांनी जुनी वस्तीत घर घेतले तसेच खामल्यातील शंकर लालवानी यांच्याकडे भाड्याने दुकान घेऊन तेथे मुस्कान कलेक्शन नावाने रेडिमेड कपड्याचे दुकान थाटले. व्यापाºयांचे जुने कर्ज बाकी असताना नवीन दुकानाला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्यावरचे कर्ज वाढतच गेले. त्यांनी घर विकून कर्जाच्या कोंडीतून निघण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यातही त्यांना यश मिळाले नाही. ते ममता सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. कर्जदारांचा सारखा तगादा सुरू झाल्याने ते कंटाळले होते. कर्जाच्या कोंडीतून सुटका होण्याचे संकेत न मिळाल्याने अखेर त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी ते दुकानात जातो म्हणून घरून निघाले. सोमवारी दुपारी त्यांच्या दुकानाच्या बंद शटरमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे आजूबाजूच्यांनी प्रतापनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी दुकानाचे शटर उघडले असता आतमध्ये बत्रा यांचा गळफास लावलेला मृतदेह पोलिसांना आढळला. काजल सुधीरकुमार बत्रा (वय ४४) यांच्या सूचनेवरून प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सुसाईड नोट जप्त
पोलिसांनी बत्रा यांच्या दुकानातून एक सुसाईड नोट जप्त केल्याचे समजते. या नोटमध्ये नेमके काय लिहून आहे, ते पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही. दरम्यान, गळफास लावण्यापूर्वी बत्रा यांनी विषही पिल्याचा संशय आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.