सुलेखा कुंभारे यांचा भाजपाला पाठिंबा
By admin | Published: September 29, 2014 01:01 AM2014-09-29T01:01:09+5:302014-09-29T01:01:09+5:30
एरव्ही काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन चालण्याच्या नारा देते, पण निवडणुकींच्या वेळी मात्र स्वत:चे उमेदवार दुसऱ्यांवर लादतात. आपल्याला पाच जागा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते
नागपूर : एरव्ही काँग्रेस समविचारी पक्षांना सोबत घेऊन चालण्याच्या नारा देते, पण निवडणुकींच्या वेळी मात्र स्वत:चे उमेदवार दुसऱ्यांवर लादतात. आपल्याला पाच जागा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, शब्द न पाळणाऱ्या कॉंग्रेसने अखेरच्या क्षणी विश्वासघात केला, असा आरोप करीत माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला पाठिंबा देणार असल्याची घोषणा केली.
रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. कुंभारे म्हणाल्या, गेल्या निवडणुकीत ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ ने काँग्रेसला सहकार्य केले. या वेळी आम्ही ५ जागांची मागणी काँग्रेसकडे केली होती. कॉंग्रेसच्या नेत्यांनी सुरुवातीला सकारात्मक आश्वासने दिली.
उमरेड आणि कामठी मतदारसंघ ‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ ला देण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु अखेरच्या क्षणी काँग्रेसने विश्वासघात करीत संजय मेश्राम आणि राजेंद्र मुळक यांना उमेदवारी दिली. गरजेच्या वेळी मदत घेऊन नंतर धोका देणे ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे. कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा केल्यानंतर आम्ही भाजपा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
वेगळ््या विदर्भाबाबत भाजप योग्य भूमिका घेईल, असा ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कुठलीही अट नाही
‘बहुजन रिपब्लिकन एकता मंच’ पूर्णपणे आमच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे भाजपाला समर्थन देत असताना कुठलीही अट टाकलेली नाही अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. गडकरी आणि माझी मैत्री राजकारणापलिकडची असून ते माझे मोठे भाऊच आहेत, अशा भावना सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केल्या