'सुलतान' अखेर बोरिवलीकडे रवाना : मुंबईतून अद्ययावत अँब्युलन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 08:13 PM2019-12-24T20:13:55+5:302019-12-24T20:17:14+5:30
गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ (सी-१) नावाच्या वाघाची मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील ‘सुलतान’ (सी-१) नावाच्या वाघाची मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईतील बोरिवली राष्ट्रीय उद्यानात रवानगी झाली.
बोरिवली येथून वनक्षेत्रपाल विजय बारब्दे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे आदींचे पथक आले होते. मंगळवारी दुपारी कायदेशिर सोपस्कर पार पडल्यावर वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. एस.व्ही. उपाध्ये, उपसनचालक डॉ. व्ही.एम. धुत, डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. मयूर पावशे, डॉ. ए. एस. शालिनी या वैद्यकीय पथकाच्या चमुने वाघाची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर दुपारी ३ वाजता बोरीवलीची चमु विशेष अँबुलन्स घेऊन सुलतानसह मुंबईकडे रवाना झाले. गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही हस्तांतराची कारवाई करण्यात आली.
या वाघाला नागपूर ते मुंबई हे ९०० किलोमिटरचे अंतर पार करायचे आहे. त्यासाठी विशेष हायड्रॉलिक पिंजऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून सुलतानला त्यातून नेण्यात येत आहे.
बोरिवली उद्यानात बिजली, मस्तानी आणि लक्ष्मी नावाच्या आठ ते दहा वर्षांच्या तीन वाघिणी आहेत. त्यांच्यासाठी प्रजननक्षम वाघाचा शोध होता. त्यानुसार कायदेशीर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने सुलतानला त्यांच्याकडे सोपविण्यात आले.
दोन जणांचा बळी घेणाऱ्या या वाघाला ब्रह्मपुरी येथून २०१८ मध्ये पकडून आणले होते. वन विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या गोरेवाडा आंतरराज्यीय प्राणिसंग्रहालय तो मुक्कामी होता. वर्षभराच्या मुक्कामानंतर आता तो बोरिवलीवासी होत आहे.