धर्मातील चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम : सुरेश द्वादशीवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 09:44 PM2018-10-17T21:44:53+5:302018-10-17T21:47:06+5:30
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणताही धर्म असो त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, तर काही वाईट. सर्वच धर्मात स्त्रियांवर अत्याचार झालेत, त्यांना दासी म्हणून वागविले. त्यामुळे धर्मांमधील वाईट गोष्टींची वजाबाकी अन् चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम होय, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणताही धर्म असो त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, तर काही वाईट. सर्वच धर्मात स्त्रियांवर अत्याचार झालेत, त्यांना दासी म्हणून वागविले. त्यामुळे धर्मांमधील वाईट गोष्टींची वजाबाकी अन् चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम होय, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्ष आणि अमर सेवा मंडळाचे संस्थापक स्व. गोविंदराव वंजारी यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त ‘सेक्युलॅरिझम’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी होत्या. व्यासपीठावर अमर सेवा मंडळाचे सचिव अॅड अभिजित वंजारी उपस्थित होते. द्वादशीवार म्हणाले, सेक्युलॅरिझम ही स्वातंत्र्य लढ्याने दिलेली देणगी, विधायक संकल्पना आहे. देशातील सर्वांचा देशावर समान अधिकार आहे. तो कोणत्याही जाती, धर्म, पंथाचा नाही असे महात्मा गांधींनी म्हटले. गांधीजी ईश्वर-अल्लात फरक मानत नसत. ते येशू ख्रिस्ताची गोष्ट सांगत, गुरु ग्रंथसाहिबची कवन म्हणत. जवाहरलाल नेहरुंनी सेक्युलॅरिझमला लोकशाहीचा पाया संबोधून त्या शिवाय लोकशाही जिवंत राहू शकत नसल्याचे सांगितले. देश अखंड ठेवण्यासाठी धर्माच्या वर उठून राष्ट्रवादाच्या पातळीवर गेले पाहिजे, असे सरदार पटेलांनी सांगितले. मोहम्मद पैगंबरांनीही आपल्या राज्यात ज्यू लोकांची संख्या असल्यामुळे जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना करण्याचा फतवा काढला होता. त्यामुळे सेक्युलॅरिझम हे सर्वांना कवेत घेणारे तत्त्व आहे. इतिहासात युद्धापेक्षा अधिक माणसे धर्मामुळे मारली गेली. त्यामुळे धर्माचे अध्ययन करताना चांगल्या, वाईट दोन्ही गोष्टींचा विचार होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मनुष्यधर्म शिकविणारा सेक्युलॅरिझमचा हाच सर्वश्रेष्ठ विचार असल्याचे द्वादशीवार म्हणाले. अॅड सुहासिनी वंजारी यांनी प्रयत्नांनी माणूस किती मोठा होऊ शकतो याचे गोविंदराव वंजारी उत्तम उदाहण असून नव्या पिढीने त्यांचा आदर्श पुढे ठेवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक अॅड अभिजित वंजारी यांनी केले. संचालन डॉ. निनाद काशीकर यांनी केले. आभार डॉ. अशोक कांबळे यांनी मानले.