उन्हाळ्यातही स्वाईन फ्लूू : नागपूर विभागात ३०४ रुग्ण व २३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 08:31 PM2019-04-06T20:31:16+5:302019-04-06T20:32:46+5:30
उन्ह वाढत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूर विभागांतर्गत येण्याऱ्या सहा जिल्ह्यात आतापर्यंत ३०४ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूचा आकडा २३ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर शहरात झाली आहे. यामुळे खबरदारीचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्ह वाढत असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ होताना दिसून येत आहे. नागपूर विभागांतर्गत येण्याऱ्या सहा जिल्ह्यात आतापर्यंत ३०४ रुग्णांची नोंद झाली असून मृत्यूचा आकडा २३ वर पोहचला आहे. यात सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद नागपूर शहरात झाली आहे. यामुळे खबरदारीचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
उन्हाळ्याला सुरुवात झाली तरी सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. हीच लक्षणे स्वाईन फ्लूची असल्याने अनेक जण याला सुरुवातीलाच गंभीरतेने घेत नाही. जेव्हा आजाराची गुंतागुंत वाढतेच तेव्हाच रुग्ण डॉक्टरांकडे जातात. यामुळे मृत्यूची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नागपूर शहरात जानेवारी ते ५ एप्रिलपर्यंत २०१ रुग्ण आणि १४ मृत्यूची नोंद झाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये २१ रुग्ण व दोन बळी गेले आहेत. वर्धा जिल्ह्यात पाच रुग्ण, गोंदिया जिल्ह्यात चार रुग्ण, भंडारा जिल्ह्यात चार रुग्ण एक मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात तीन रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात सहा रुग्ण एक मृत्यूची नोंद आहे. मंडळाबाहेरील जिल्ह्यात, अमरावती येथे २३ रुग्ण चार मृत्यू, अकोला येथे दोन रुग्ण तर यवतमाळ येथे दोन रुग्ण एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याबाहेरील रुग्णांमध्ये मध्यप्रदेशातील ३० तर पश्चिम बंगालमधील एक रुग्णांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत शहरात नऊ रुग्ण व एक मृत्यू तर नागपूर ग्रामीणमध्ये पाच रुग्ण व एक मृत्यू आहे.
मेडिकलचा वॉर्ड क्र. २५ रुग्णसेवेत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वॉर्ड क्र. २५चे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण या वॉर्डात ठेवण्यास सुरुवात झाली आहे. सध्या चार रुग्ण उपचार घेत आहेत. यात शुक्रवारी आणखी दोन महिला रुग्णांची भर पडली आहे. तर, शहरातील ११ खासगी इस्पितळांमध्ये १९ रुग्ण उपचार घेत आहेत.