उन्हाळा लागताच मसाल्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:26+5:302021-03-21T04:08:26+5:30

- लॉकडाऊनचाही परिणाम, मिरचीची आवकही वाढली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष ...

As summer approached, the prices of spices increased | उन्हाळा लागताच मसाल्यांचे दर वाढले

उन्हाळा लागताच मसाल्यांचे दर वाढले

Next

- लॉकडाऊनचाही परिणाम, मिरचीची आवकही वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, जगभरात भारतीय व्यंजनांची ओळख मसाल्यांच्या वापरामुळेच आहे; परंतु सध्या मसाल्यांचे दर वाढले आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच, दरवर्षी ही दरवाढ दिसून येते. भारतात घरोघरी मसाल्यांचे नियोजन वर्षभराचे असते. त्यामुळे, वर्तमानात मसाल्यांची दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.

साधारणत: उन्हाळा लागला की घरोघरी पापड, कुरडया, शेवई आदींची रेलचेल असते. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात कच्चे मसाले घेणे, ते वाळवणे आणि किसनयंत्रावर त्याची बारीक पावडर करण्याचे चलन आहे. त्यामुळे, उन्हाळ्यात अचानक मसाल्यांची मागणी वाढलेली असते. मात्र, सद्य:स्थितीत मागणी वाढली नसतानाही मसाल्यांचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन हे त्यामागचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. यासोबतच बाजारात मिरचीची आयातही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लॉकडाऊनच्या भीतीने मिरचीची साठवणूक करण्याकडे अनेकांचा भर आहे. त्याचा परिणाम मिरचीचे दरही चढेच दिसून येत आहेत.

----------------

कोरोना प्रतिरोधासाठी वाढली मागणी

गेल्या वर्षी कोरोना संसर्गापासून संरक्षण म्हणून आणि स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेकांचा ओढा आयुर्वेदाकडे वळला. आयुर्वेदात स्वयंपाकघरातील मसाल्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्याने, या मसाल्यांच्या वापरातून काढा पिण्यावर अनेकांचा भर होता. आता पुन्हा एकदा संक्रमणाचा वेग वाढला असल्याने अनेकांनी पुन्हा एकदा काढ्याकडे मोर्चा वळवला आहे आणि त्याचा परिणाम मसाल्याचे दर वाढत असल्याचे सांगितले जाते.

------------

बॉक्स...

मसाल्याचे दर (प्रति किलो)

धने - ७५ ते ८० रुपये

जिरे - १७० ते १८० रुपये

तीळ - ११० रुपये

खसकस - १४०० ते १४५० रुपये

खोबरे - १९० ते २०० रुपये

मेथी - ७५ ते ८० रुपये

हळद - १४० ते १५० रुपये

लवंग - ४५० रुपये

छडीला - ५५० रुपये

गरमफुल - १००० रुपये

नाकेश्वर - २८० ते ३०० रुपये

वेलदोडे - ५०० ते ८०० रुपये

कलमी - ३५० रुपये

तेजपान - ६० रुपये

जायपत्री - २२०० ते २३०० रुपये

जायफळ - ८०० रुपये

----------------

मिरचीचे दर (प्रति किलो)

तेजा - १४० ते १५५ रुपये

रोशनी - ११० ते १४० रुपये

डीडी, सी ५ - १३० ते १५० रुपये

दीपिका - १७० रुपये

चपाटा - २२० ते २४० रुपये

भिवापुरी - १४० ते १६० रुपये

------------

दर आठवड्यात उतरताहेत ३० हजार पोती

कळमना बाजारात दर आठवड्यात मिरचीची २५ ते ३० हजार पोती उतरत आहेत. नागपुरात उमरेड, भिवापूर, कुही मांढळ, राजुरा, सिरोंचा येथून मिरची मोठ्या प्रमाणात उतरते. सोबतच आंध्र व तेलंगणा येथील खमन, गुंटूर, वारंगल येथूनही मोठ्या प्रमाणात मिरची उतरत आहे. तेजा, रोशन, डीडी, सी ५, दीपिका, चपाटा, भिवापुरी मिरचीची मोठ्या प्रमाणात मागणी असते. येत्या काळात दर वाढण्याची शक्यता आहे.

- राकेश वाधवानी, मिरची व्यापारी

------------------

आंतरराष्ट्रीय बाजारावर मसाल्याचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारावर मसाल्याचे दर निश्चित होत असतात. भारतात विविध राज्यांसह सिंगापूर, इंडोनेशिया आणि इतर देशांतूनही मोठ्या प्रमाणात मसाल्याची आयात होत असते. आयात कर, डॉलरचे रेट, सोने, पेट्रोल यांच्या किमतीवर हे दर निश्चित होत असतात. त्यामुळेच कदाचित मसाल्याचे दर वाढत आहेत. शिवाय, लॉकडाऊनमुळेही हे दर वाढत आहेत.

- प्रकाश वाघमारे, संचालक - वाघमारे मसाले

..............

Web Title: As summer approached, the prices of spices increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.