बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:18 PM2019-05-15T12:18:57+5:302019-05-15T12:19:21+5:30

कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला.

Summons to two managers of Baroda Bank | बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स

बडोदा बँकेच्या दोन व्यवस्थापकांना समन्स

googlenewsNext
ठळक मुद्दे कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनातून अवैध कपात करण्यासंदर्भातील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बडोदा बँकेच्या नवी दिल्ली येथील संसद मार्ग शाखेचे मुख्य व्यवस्थापक व नागपुरातील महाल शाखेचे व्यवस्थापक यांना समन्स बजावला.
निवृत्ती वेतन खात्यातून एप्रिल-२०१६ पासून दर महिन्याला ५,३३६ रुपये कपात करण्यात आल्यामुळे बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी विष्णू बुराडे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वरील अधिकाऱ्यांना समन्स बजावला. त्यांना येत्या १० जून रोजी न्यायालयात व्यक्तिश: उपस्थित होऊन यावर स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश देण्यात आला. तसेच, या आदेशाचे उल्लंघन झाल्यास दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली. पुढील तारखेपर्यंत समाधानकारक आदेश जारी करून त्याची माहिती याचिकाकर्त्याला देण्यात आल्यास दिल्ली येथील मुख्य व्यवस्थापकांना न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्रीय वित्त मंत्रालयालादेखील नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. याचिकेतील माहितीनुसार, बँक व्यवस्थापनाने याचिकाकर्त्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचे निर्देश दिले नाहीत. असे असताना याचिकाकर्त्याच्या निवृत्ती वेतनातून कशाची कपात केली जात आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. याचिकाकर्त्याने यासंदर्भात बँकेला निवेदन सादर केले होते, पण त्याची दखल घेतली नाही. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. व्ही. आर. थोटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Summons to two managers of Baroda Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.