एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:41 PM2019-06-14T23:41:56+5:302019-06-14T23:43:24+5:30

एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.

Sun rise from Everest not forgot : The 35-day emotional migration told by Pranav | एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

एव्हरेस्टवरून सूर्योदयाचे दृश्य विसरणार नाही : प्रणवने मांडला ३५ दिवसांचा भावनिक प्रवास

googlenewsNext
ठळक मुद्देएव्हरेस्टवीराचा हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न प्रत्येक गिर्यारोहकाचे असते, तसे ते बालपणापासून माझाही पिच्छा सोडत नव्हते. २०१६ ला अपयशी झालो आणि हे स्वप्न अधिकच बळावले. तीन वर्षाच्या तयारीनंतर २०१९ हे वर्ष माझे ठरले. २३ मेचा अंतिम दिवस असताना आम्ही २० मेच्या पहाटे ७.३० वाजता एव्हरेस्टवर पोहचलो. त्या अत्युच्च शिखरावरून पाहताना केशरी रंग चढविलेला सूर्य हळूहळू वर येत होता. एव्हरेस्ट सर करण्यासह त्या टोकावरून सूर्योदय पाहण्याचे स्वप्नही पूर्ण झाले. हे दृश्य मी आयुष्यात कधीही विसरणार नाही, असे भावनिक मनोगत विदर्भाचा एव्हरेस्टवीर प्रणव बांडबुचे याने व्यक्त केले.
सीएसी ऑलराऊंडर अ‍ॅडव्हेंचरतर्फे नागपूरचे भूषण ठरलेल्या प्रणव बांडबुचे याचा हृद्य सत्कार शुक्रवारी विष्णूजी की रसोई, बजाजनगर येथे करण्यात आला. यावेळी प्रणवने एव्हरेस्टच्या सर्वोच्च स्थानावर पोहचण्याचा प्रवास मांडला. याप्रसंगी मैत्री परिवारचे अध्यक्ष संजय भेंडे, निखिल मुंडले, तेजिंदर सिंह रेणू व शेफ विष्णू मनोहर उपस्थित होते. प्रणवने सांगितले, १५ एप्रिलला काठमांडूवरून हेलिकाप्टरने एव्हरेस्टच्या पायथ्याशी नामचे येथे पोहचलो. त्यानंतर १९ एप्रिलपासून रोटेशननुसार आमच्या टीमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर बेस कॅम्पपासून १६ मे रोजी प्रत्यक्ष समिट पुशला सुरुवात झाली. पुढे पहिला डेथ झोन समजला जाणारा खुंब आईसफॉल पार केला.
प्रणवने पुढे सांगितले, यावर्षीचे वातावरण अतिशय धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळेच यावर्षी ११ गिर्यारोहकांचे एव्हरेस्ट सर करताना मृत्यू झाले तर १४ लोकांना दृष्टिदोषाची समस्या निर्माण झाली. आधीच्या अंदाजानुसार आम्हाला २३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे समिट पुशपासून आम्ही आमचे नियोजन केले होते. सुदैवाने नियोजनानुसार बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानुसार कॅम्प २, कॅम्प ३ आणि सर्वात धोकादायक कॅम्प ४ नंतरचा प्रवास करून आम्ही १९ मे रोजी साऊथ पोलला पोहचलो. तिथे अधिक वेळ न थांबता आमचा प्रवास सुरू केला आणि २० मेच्या पहाटे ७.३० वाजता आम्ही जगातील सर्वात उंच शिखरावर होतो. सर्वोच्च शिखरावर पोहचण्याचा आनंद शब्दात सांगू शकत नसल्याची भावना त्याने व्यक्त केली. शिखरावर गेले की खाली यावेच लागते. १० मिनिटे तेथे घालविल्यानंतर पुढचा धोका लक्षात घेऊन आम्हाला परतावे लागले व तो प्रसंग निराशादायी वाटल्याची भावना त्याने मांडली.
प्रणव आता अनेक तरुणांचा प्रेरणास्रोत ठरला आहे. तो सांगतो, एकदा नापास झाले की पुन्हा परीक्षा देऊन पास व्हावेच लागते. माझेही तसेच झाले. २०१६ ला अपयशी झाल्यानंतर मला पास व्हायचे होते आणि हीच माझी प्रेरणा ठरल्याचे तो म्हणाला. खाली आलो तेव्हा नागपूरची अनेक मुले तयार होती. त्यांना पाहून थकवा दूर झाला व पुन्हा त्यांच्यासोबत बेस कॅम्पपर्यंत गेल्याचे त्याने सांगितले. त्याने गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगत तरुणांना या क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.
यावेळी एव्हरेस्ट प्रवासात प्रणवने वापरलेले साहित्यही आणि प्रवासातील छायाचित्रांचे पडद्यावर प्रदर्शन येथे करण्यात आले. सीएसीचे अमोल खंते व विजय जत्थे यांनी संचालन केले.

Web Title: Sun rise from Everest not forgot : The 35-day emotional migration told by Pranav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.