नवतपामध्ये सूर्य आग ओकणार : शनिवारपासून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:58 PM2019-05-24T22:58:43+5:302019-05-24T23:01:21+5:30
शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात गेल्या तीन दिवसापासून पारा ४६ डिग्रीवर खेळत आहे. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. यातच शनिवारपासून नवतपाला सुरुवात होणार असल्याने तापमानाचा ताप आणखी वाढणार आहे. या काळात पारा ४७ डिग्रीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. परिणामी, नवतपाचा ताप सहन करण्यासाठी शहरवासीयांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
शहरात शुक्रवारी ४६ डिग्री तापमानाची नोंद झाली. गुरुवारच्या तुलनेत तापमान ०.२ डिग्रीने घटले, पण ही अत्यल्प घसरण दिलासादायक ठरली नाही. विदर्भातील तापमानात ४६.६ डिग्रीसह चंद्रपूर पहिल्या तर, नागपूर दुसऱ्या स्थानावर राहिले. ब्रह्मपुरीत ४५.८, वर्धेत ४५, गडचिरोलीत ४४.८, अकोल्यात ४४.४, गोंदियात ४४, अमरावतीत ४३.६, यवतमाळात ४३.५, वाशिम येथे ४३ तर, बुलडाणामध्ये ४१ डिग्री तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात बुधवारी ४६ तर, गुरुवारी ४६.२ डिग्री तापमान होते. गेल्या ३० एप्रिल रोजी सर्वाधिक ४६.३ डिग्री तापमानाची नोंद झाली होती. हवामान विभागाने नवतपामुळे रेड अलर्ट जारी करून चंद्रपूर, ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती व यवतमाळ येथे अचानक पारा चढेल असा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे.
एसी, कुलर बिनकामाचे
सध्या एसी व कुलर बिनकामाचे झाले आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कुलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागते. एसीची क्षमताही कमी पडत आहे. नागरिक त्रस्त झाले आहेत.
रेड अलर्टचा अर्थ
तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ डिग्रीने जास्त राहण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट जारी केला जातो. या काळात चार-पाच दिवस समान परिस्थिती कायम राहते. ऑरेंज अलर्टमध्ये पारा सामान्यपेक्षा ३ ते ४ डिग्री जास्त असतो.
दुपारी बाहेर पडू नका
उन्हात जायचे असल्यास पूर्ण अंग झाकल्या जाईल असे सुती कपडे घाला. डोके व चेहऱ्याला सुती कपडा बांधा असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, त्यांनी दुपारी १२ ते ४.३० पर्यंत घराबाहेर पडण्यास मनाई केली व ताक, लिंबू सरबतसह भरपूर पाणी पिण्यास सांगितले.