रविवारी सावली सोडणार साथ : १२.१० वाजता डोक्यावर येईल सूर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 09:26 PM2019-05-25T21:26:01+5:302019-05-25T21:26:56+5:30
अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंधार सोडला तर आपली सावली कधीही साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. पण दिवसा कायम सोबत राहणारी आपली सावली यावेळी भरदिवसा एका क्षणाला आपली साथ सोडणार आहे. होय, रविवारी २६ मे रोजी १२.१० वाजता ही सावली आपल्याला अजिबात दिसणार नाही.
खगोलशास्त्राच्या भाषेत याला ‘शून्य सावली दिवस’ (झिरो शॅडो डे) असे संबोधले जाते. खगोलशास्त्र तज्ज्ञानुसार येत्या २६ मे रोजी भर दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी हा शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. जिल्ह्यात २४ ते २८ मे या काळात शून्य सावलीचा अनुभव येईल. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली, असे वाटते. ही खगोलीय घटना रोमांचकारी अनुभवच आहे. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धु्रव २३.५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे २३.५ अंश आणि उत्तरेकडे २३.५ अंश भ्रमण करताना दिसतो. एखाद्या अंशावर सूर्याचा कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जुळते आणि शून्य सावली अनुभवता येते. त्यावेळी कोणत्याही वस्तूची सावली दुपारी पडत नाही. सूर्याचा आंशिक कोन मोठा असल्याने एकाच वर्षी दोनदा शून्य सावली अनुभवता येते. वर्षातून दोनदा सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस म्हणतात. मे महिन्यात ३ ते ३० मेदरम्यान १५ ते २२ उत्तर अक्षांशावर महाराष्ट्रात शून्य सावली दिवस घडतो. राज्यात २० ते ३० मेदरम्यान आणि १६ जुलै व ५ ऑगस्टदरम्यान शून्य सावली दिवसाचा अनुभव येईल. मात्र या काळात पावसाळा राहत असल्याने ढगाळ वातावरणामुळे ते पाहता येत नाही. मात्र मे महिन्यात हा अनुभव घेता येतो. पृथ्वीवर मकरवृत्त दक्षिणेकडच्या भागात आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधी डोक्यावर येत नाही. पण दोन टोकांच्या वृत्तामधील लोकांना सूर्य वर्षातून दोनदा डोक्यावर आल्याचा अनुभव येतो व शून्य सावलीचा अनुभव मिळतो.
पूर्वी आपली पृथ्वी सपाट आहे, अशी मान्यता होती. मात्र शून्य सावलीच्या प्रयोगामुळे पृथ्वी सपाट नसून गोल आहे व ती आपल्या अक्साभोवती फिरते, हे गृहितक सिद्ध करण्यात यश आले. हे यामागचे वैज्ञानिक महत्त्व आहे.
रमण विज्ञान केंद्रात शून्य सावलीचा प्रयोग
मुलांना झिरो शॅडो डेचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा व त्यामागचे विज्ञान समजावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंद्वारे ही घटना प्रत्यक्ष दाखविण्यात येणार आहे. ११.३० वाजतापासून १२.१० पूर्वी, त्यावेळी आणि त्यानंतर काय फरक दिसतो, हे प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. शून्य सावलीचा अनुभव केवळ नागपुरात घेता येणार आहे. त्यामुळे एक मीटर रॉडच्या मदतीने नागपूर, भोपाळ आणि दिल्ली येथे एकाचवेळी काय परिस्थिती असेल आणि पडणाऱ्या सावलीची लांबी किती असेल, याचा प्रयोग दाखविण्यात येणार असल्याची माहिती केंद्राचे तांत्रिक अधिकारी महेंद्र वाघ यांनी दिली.