सुनील केदारांनी होम ट्रेडला दिले होते ४० कोटी कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:30 AM2019-10-18T11:30:05+5:302019-10-18T11:30:35+5:30
ज्या होम ट्रेड सेक्युरिटीजने नागपूर जिल्हा बँकेला ९४ कोटीची टोपी घातली त्याच कंपनीच्या प्रवर्तक कंपनीला सुनील केदारांनी बँकेतून ४० कोटी कर्ज दिल्याचे उघड झाले आहे.
सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या होम ट्रेड सेक्युरिटीजने नागपूर जिल्हा बँकेला ९४ कोटीची टोपी घातली त्याच कंपनीच्या प्रवर्तक कंपनीला सुनील केदारांनी बँकेतून ४० कोटी कर्ज दिल्याचे उघड झाले आहे.
होम ट्रेड सेक्युरिटीजच्या प्रवर्तक कंपनीचे नाव युरो डिस्कव्हर इंडिया लिमिटेड असे असून या कंपनीने होम ट्रेड सेक्युरिटीजचे ४० कोटीचे शेअर्स नागपूर जिल्हा बँकेकडे गहाण ठेवले व त्यावर ४० कोटी कर्ज केदारांनी मंजूर केले.
विशेष म्हणजे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला अंधारात ठेवून सर्क्युलर ठरावाने केदार यांनी हे कर्ज १४ सप्टेंबर २००० रोजी मंजूर केले. या सर्क्युलर ठरावावर जिल्हा बँकेच्या २६ पैकी फक्त ७ संचालकांनी सह्या केल्या होत्या तरीही केदारांनी ही भली मोठी रक्कम त्याचदिवशी युरो डिस्कव्हर इंडियाच्या खात्यात जमा केली. नागपूर जिल्हा बँकेच्या याच ४० कोटीचे भांडवल म्हणून युरो डिस्कव्हर इंडियाने २००१ मध्ये होम ट्रेड सेक्युरिटीजची स्थापना वाशी रेल्वे स्टेशन संकुलात केली व नागपूर जिल्हा बँकेलाच ९४ कोटीची टोपी घातली. एमबीए असलेल्या केदारांना मात्र युरो डिस्कव्हरचा हा बनाव कळलाच नाही.
वाशीला व्यवसाय सुरू झाल्यानंतर केदार यांनी फेब्रुवारी २००१ मध्ये होम ट्रेडशी रोखे व्यवहार सुरू केला पण त्यापूर्वी सहा महिने आधीच त्यांनी युरो डिस्कव्हर इंडिया या मुंबईच्या कंपनीस कर्ज दिले. नागपूर जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र नागपूर जिल्ह्यापुरते मर्यादित असताना कार्यक्षेत्राबाहेर केदारांनी कर्ज दिले हे स्पष्ट आहे.
नागपूर जिल्हा बँकेच्या रोखे घोटाळ्यातील युरो डिस्कव्हरचे कर्ज हा सर्वात काळाकुट्ट पैलू आहे. हा सर्व गैरप्रकार केदारांनी नागपूरच्या एका ज्येष्ठ चार्टर्ड अकाऊंटच्या सल्ल्यावरून केला होता. या चार्टड अकाऊंटटने आपण युरोे डिस्कव्हरचे संचालक संजय अग्रवाल व कंपनी सेक्रेटरी एन.एस.त्रिवेदी यांना ओळखतो असे शपथपत्र बँकेत सादर केले होते. सध्या हे चार्टर्ड अकाऊंटंट हयात नाहीत.