सुनील केदारांचा रुग्णालयातील मुक्काम वाढणार! ॲन्जिओग्राफीचा डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 05:35 AM2023-12-24T05:35:20+5:302023-12-24T05:36:22+5:30
घशाच्या संसर्गावरही उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर ( Marathi News ): जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने आ. सुनील केदार यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना मेडिकल इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्या ईसीजीमध्ये बदल दिसून आले होते. शनिवारी हृदयरोग तज्ज्ञांनी त्यांची तपासणी करून ‘ॲन्जिओग्राफी’ चा सल्ला दिला. यामुळे केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी केदार यांची शिक्षा जाहीर झाल्यानंतर त्यांना तपासणीसाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले. तपासणीत ‘हार्ट रेट’ कमी दिसले. शिवाय घशात इन्फेक्शन व मायग्रेनचाही त्रास होता. त्यांना ऑक्सिजन दिला जात आहे. हृदयविकारावरील उपचारासाठी शनिवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्यात आली.
कैदी रुग्णांबाबत निर्देश
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कैदी रुग्णांबाबतच्या निर्देशानुसार, कैदी रुग्णाचा ७ दिवसांपर्यंत कार्यकाळ वाढविल्यास त्याची माहिती अधिष्ठात्यांना व कार्यमिमांसा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांकडे द्यावी लागेल. विनाकारण कैदी दाखल करून ठेवल्यास संबंधित विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. तसेच संस्था प्रमुखांकडून खुलासा घेण्यात येईल, अशा सूचना आहेत.