सुनील केदारांचा एमआरआय नॉर्मल, सीटी अँजिओग्राफीसाठी लागणार वेळ!
By सुमेध वाघमार | Published: December 24, 2023 06:12 PM2023-12-24T18:12:14+5:302023-12-24T18:14:51+5:30
या तपासणीचा अहवाल 'नॉर्मल' आल्यावरच त्यांची मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता आहे.
नागपूर : मेडिकलच्या आयसीयूमध्ये भरती असलेले माजी मंत्री सुनील केदारांचा एमआरआयचा अहवाल रविवारी नॉर्मल आला. परंतु क्रिएटीनीन वाढल्याने 'सीटी अँजिओग्राफी' पुढे ढकलण्यात आली. या तपासणीचा अहवाल 'नॉर्मल' आल्यावरच त्यांची मेडिकलमधून सुटी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँक रोखे घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने केदार यांना पाच वर्षांची कारवासाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना मेडिकलमध्ये आणण्यात आले. येथे त्यांना घशाचा संसर्ग, मायग्रेनचा त्रास असल्याचे आणि ईसीजीमध्ये 'हार्ट रेट' कमी असल्याचे आढळून आले. त्यांना वॉर्ड क्र.५२ या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले.
शनिवारी सुपर स्पेशालिट हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञानी त्यांची तपासणी करून सीटी अँजिओग्राफीचा सल्ला दिला. रविवार सुटीचा दिवस असतानाही ही तपासणी होणार होती. परंतु त्यापूर्वी करण्यात येणाऱ्या तपासणीत क्रिएटीनीन वाढल्याचे आढळून आले. यामुळे ही तपासणी पढे ढकलण्यात आली. मायग्रेनचा निदानासाठी त्यांचा एमआरआय करण्यात आला असता, तो नॉर्मल आला.
'एक्स-रे'मध्ये त्यांच्या छातीत कफ असल्याचेही दिसून आले. यामुळे रविवारची रात्रही त्यांची मेडिकलमध्ये गेली. एकूणच मेडिकल प्रशासन शक्य तितक्या लवकरच विविध तपासण्या, आजाराचे निदान व उपचार करून त्यांना सुटी देण्याचा प्रयत्नात असल्याचे चित्र आहे.