जिल्हा बँक घोटाळ्यात न्यायालयाने नोंदविला सुनील केदार यांचा जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:12 AM2021-09-10T04:12:20+5:302021-09-10T04:12:20+5:30
नागपूर : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी गुरुवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याच्या ...
नागपूर : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी गुरुवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी प्रतिभूती खरेदी घोटाळ्याच्या खटल्यामध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा जबाब नोंदवून घेतला. दरम्यान, केदार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप अमान्य केले. केदार हे या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत.
फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३१३ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली. त्याकरिता केदार दुपारी १२ च्या सुमारास न्यायालयात आले. त्यानंतर ते सुमारे एक तास न्यायालयात हजर होते. यावेळी केदार यांच्याप्रमाणे बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबनीस सुरेश दामोदर पेशकर (नागपूर), प्रतिभूती दलाल केतन कांतिलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद), महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतिलाल पोद्दार (कोलकाता) या आरोपींचाही जबाब नोंदविण्यात आला.
या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तावेज खरे भासविणे), १२०-ब (कट रचणे) व ३४ (समान उद्देश) अंतर्गत दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. २००१-२००२ मध्ये बँकेच्या रकमेतून होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंटस् प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डिलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई यांच्याकडून सरकारी प्रतिभूती खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे बँकेचे सुमारे १५३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.