सुनीता मीणा ठरल्या ५ सुवर्णपदकांच्या मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:27 PM2024-04-15T20:27:48+5:302024-04-15T20:27:59+5:30

भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ.

Sunita Meena won 5 gold medals | सुनीता मीणा ठरल्या ५ सुवर्णपदकांच्या मानकरी

सुनीता मीणा ठरल्या ५ सुवर्णपदकांच्या मानकरी

जितेंद्र ढवळे, नागपूर : राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) भारतीय महसूल सेवेच्या ७६ व्या प्रशिक्षण तुकडीच्या दीक्षांत समारंभात सोमवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. एनएडीटीच्या १६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीदरम्यान विविध क्षेत्रात सर्वोत्तम ठरलेल्या ७ प्रशिक्षणार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते ११ सुवर्ण पदकांनी गौरविण्यात आले. सर्वोत्तम प्रशिक्षणार्थ्यांच्या सुवर्ण पदकासह सुनीता मीणा यांनी सर्वाधिक ५ सुवर्ण पदक पटकाविली. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, राज्यसभेचे महासचिव प्रमोदचंद्र मोदी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता, प्रत्यक्ष कर विभागाच्या प्रशिक्षण महासंचालनालयाचे प्रधान महासंचालक सिमांचल दास, एनएडीटीचे महासंचालक आनंद बैरवार मंचावर उपस्थित होते.

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना धनखड म्हणाले, तंत्रज्ञानाच्या कुशल उपयोगातून आज प्रत्यक्ष कर क्षेत्रातही मोठे बदल घडत आहेत. या बदलत्या परिस्थितीत सरकारी सेवक म्हणून शिस्तपूर्ण आचरण आणि वचनबद्धतेच्या भावनेतून आपल्या कार्याचे आदर्श मापदंड निर्माण करा, अशी साद त्यांनी घातली. तत्पूर्वी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी स्वागतपर भाषणात मंडळाच्या प्रगतीचा आलेख मांडला. एनएडीटीच्या प्रशिक्षण कार्यक्रम संचालक लैना बालन यांनी ७६ व्या तुकडीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. प्रशिक्षणार्थी झेबाखान मन्सुरी आणि धोनेपुडी विजयबाबू यांनी प्रशिक्षण कालावधीतील अनुभव कथन केले. प्रशिक्षणार्थी प्रिया सिंह यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

- देशाला मिळणार ५८ अधिकारी
एनएडीटी ही भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी देशातील सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या ७६ व्या तुकडीमध्ये भारतीय महसूल सेवेचे ५६ अधिकारी आणि रॉयल भुटान सेवेचे २ अशा एकूण ५८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. डिसेंबर २०२२ मध्ये एनएडीटीमध्ये दाखल झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये २४ महिलांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण भारतीय महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना सेवेत रुजू होण्यापूर्वी एनएडीटीमध्ये १६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

Web Title: Sunita Meena won 5 gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर