दिवसा उन्हाचे चटके, रात्री गारवा; दाेन दिवसांत पारा २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 08:45 PM2023-05-11T20:45:40+5:302023-05-11T20:46:25+5:30
Nagpur News बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नागपूर : सूर्याचा पारा दिवसागणिक संथगतीने वाढत आहे. गुरुवारी उन्हाच्या चटक्यांनी नागरिकांना हैराण केले. मात्र, रात्रीचा पारा आश्चर्यकारकरित्या घसरल्याचे दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या माेखा चक्रीवादळाचा कुठलाही प्रभाव विदर्भावर नसून पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचे तापमान २ ते ३ अंशाने वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात सुरू असलेली संथगती वाढ गुरुवारीही दिसून आली. नागपुरात पारा ०.१ अंशाने वाढून ४१.३ अंशांवर पाेहोचला, तरीही ताे सरासरीपेक्षा अद्याप १.७ अंशाने कमी आहे. विदर्भात वर्धा आणि अकाेल्यात सर्वाधिक ४३ अंश तापमानाची नाेंद झाली. गडचिराेली व वाशिममध्ये पारा ४० अंशांवर आहे तर इतर शहरात ताे ४१ अंशाच्या वर गेला आहे. मात्र, रात्रीच्या पाऱ्यात झालेली घसरण आश्चर्य वाटणारी आहे. कदाचित माेखा चक्रीवादळाच्या प्रभावाने किमान तापमान घसरल्याचे बाेलले जात आहे.
गुरुवारी रात्रीचा पारा ३.१ अंशाने घसरून २१.६ अंशावर गेला, जाे सरासरीपेक्षा ५.९ अंशाने कमी आहे. गडचिराेली आणि यवतमाळ वगळता इतर सर्व शहरांत किमान तापमान २ ते ७ अंशांपर्यंत घसरले. गाेंदियात २४ तासांत सर्वाधिक ४.७ अंशाने घसरून १९.८ अंशाची नाेंद करण्यात आली. दरम्यान, पुढच्या दाेन दिवसांत दिवसाचा पारा २ ते ३ अंशाने वाढण्याचा आणि त्यानंतर तेवढ्याच अंशाने घटणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.