सनी देओलने दिली नागपुरात स्मृती मंदिराला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:32 PM2019-08-14T13:32:08+5:302019-08-14T13:33:26+5:30
सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक व सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी त्यांच्यासोबत होते.
सनी देओल यांचे मंगळवारी नागपुरात आगमन झाले आहे. त्यांनी आल्यानंतर नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. रात्री डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचल्यानंतर ते थेट रात्री ९.१५ वाजताच्या दरम्यान नितीन गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी पोहचले. गडकरी यांनी त्यांना घरी भोजनाचे निमंत्रण दिले होते व सनी यांनी ते सहर्ष स्वीकारले. घरी पोहचल्यानंतर गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी व मातृभूमी प्रतिष्ठानचे छोटू भोयर उपस्थित होते. यानंतर सनी देओल यांनी गडकरी कुटुंबाच्या कुलदेवतेचे दर्शन घेतले. त्यांनी गडकरी यांच्या प्रकृतीची चौकशी केली व देशहितासाठी काम करताना आपल्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची विनंती केली. राजकीय व इतर विविध विषयावर काही काळ चर्चा केल्यानंतर त्यांनी गडकरी व कुटुंबासोबत स्नेहभोजन घेतले. सनी देओल जवळपास दोन तास गडकरी यांच्या निवासस्थानी होते व त्यानंतर ते थेट हॉटेलकडे रवाना झाले.