वंचितांच्या अंगणात उजळली दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:49 AM2017-10-18T00:49:42+5:302017-10-18T00:50:04+5:30
दिवाळी हा आनंदाचा सण. फराळ, फटाके, नवीन कपडे यांची या प्रकाशपर्वात नुसती चंगळ असते. परंतु ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्या अंधारलेल्या अंगणी साध्या पणतीलाही तेल लाभत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी हा आनंदाचा सण. फराळ, फटाके, नवीन कपडे यांची या प्रकाशपर्वात नुसती चंगळ असते. परंतु ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे त्यांच्या अंधारलेल्या अंगणी साध्या पणतीलाही तेल लाभत नाही. फराळ, फटाके, नवीन कपडे ही तर फारच लांबची गोष्ट. अशा वंचित जीवांनाही दिवाळीचा हा आनंद उपभोगता यावा, या उद्देशाने कर्तव्यम् बहुद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आणि तीन अनाथालयातील सुमारे १०० विद्यार्थ्यांसोबत कौटुंबिक वातावरणात दिवाळी साजरी करीत त्यांना भेटवस्तूही दिल्या. यामध्ये वंजारी नगरातील जिव्हाळा परिवार, कामठी रोडस्थित जीवन आश्रम परिवार आणि प्लॅटफार्म ज्ञान मंदिराच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कर्तव्यम् बहुद्देशीय संस्थेने हा आदर्श उपक्रम चार वर्षांआधी सुरू केला. तेव्हापासून तो अविरत सुरू आहे. यंदा क्रीडा चौकातील भैयाजी पांढरीपांडे इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्क महाविद्यालयात बुधवारी हा उपक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डी.सी.पी. एस. चैतन्य, आयआयटी गुरूकुलचे प्रवीण सर, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत आगलावे, कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक कांबळे, वृत्तपत्र वितरक संजय चोरडिया यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष प्रशांत तुंगार उपस्थित होते. यावेळी जीवन आश्रम परिवारचे विकास शेंडे, राकेश गजभिये यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात १०० विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. संचालन श्वेता सारंग तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर हातागळे यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण पांढरे, सचिन घोडे, अभिजित केसरे, दीपक माने, सतीश कांचनकर, नितीन बावनकर, शुभम लोखंडे, मंगेश मुळे व अमोल नाचनकर यांनी सहकार्य केले.