उपराजधानीच्या ‘सुपर’ला कळलेच नाही सॅनिटरी पॅडचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:44 AM2018-02-05T11:44:26+5:302018-02-05T11:46:15+5:30
मुंबईच्या महानगरपालिकेने आपल्या ३४५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सॅनिटरी पॅडचे महत्त्वच कळले नसल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सॅनिटरी पॅडविषयी समाजात असणाऱ्या गैरसमजांवर भाष्य करणारा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रदर्शनाचा वाटेवर आहे तर मुंबईच्या महानगरपालिकेने आपल्या ३४५ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला सॅनिटरी पॅडचे महत्त्वच कळले नसल्याचे वास्तव आहे. वर्षभरापूर्वी रुग्णालयाच्या वॉर्डावॉर्डातील महिलांच्या स्वच्छतागृहात लावलेले सॅनिटरी पॅडच्या वेंडिंग मशीन्स बंद पडल्या आहेत. यामुळे रुग्णांची कुचंबणा होत असून राज्यातील पहिलाच प्रयोग फसला आहे.
भारतात ८८ टक्के स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी जुने फडके, काहीवेळा वर्तमानपत्र अशांसारख्या साधनांचा उपयोग करतात.परिणामी जवळजवळ ७० टक्के स्त्रियांना जननसंस्थेमध्ये संसर्ग होऊन त्यासंबंधीच्या रोगांना सामोरे जावे लागते. शिवाय हा विषय अत्यंत खासगी असल्याने त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. विशेष म्हणजे रुग्ण असतानाही संकोचामुळे या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे आजार आणखी गंभीर होण्याची शक्यता राहते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणारे ८० टक्के रुग्ण हे दारिद्र्य रेषेखालील असतात. यामुळे महिला रुग्णांना डॉक्टरांनी ‘सॅनिटरी पॅड’ वापरण्याची सूचना केली तरी पैशांअभावी ‘पॅड’ वापरले जात नाही. याची दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली. रुग्णांच्या सोयीसाठी ‘सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन’ उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आमदार प्रा. गिरीश व्यास यांना विनंती केली. आ. व्यास यांनी या मागणीला गंभीरतेने घेत निधी उपलब्ध करून दिला. यामुळे दहा ‘सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन’ विकत घेण्यात आल्या. गेल्या वर्षी या मशीन वॉर्डावॉर्डातील महिल्यांच्या स्वच्छतागृहात लागल्या. या मशीनसोबत वापरलेले ‘सॅनिटरी पॅड’ जाळण्याचे यंत्रही उपलब्ध करून देण्यात आले होते. यामुळे वापरलेल्या पॅडचा कचरा कुठेही दिसणार नव्हता. या ‘पॅड’चा खर्च रुग्णाला साधारण दोन रुपये येणार होता. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयातील हा पहिलाच प्रयोग होता. परंतु या मशीन लागल्यापासून काही सुरू होऊन बंद पडल्या तर काही सुरूच झाल्या नाही. रुग्णालयाच्या विशेष कार्य अधिकारी पद सांभाळलेल्या अधिकाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केले. यामुळे रुग्णालय प्रशासनाला ‘सॅनिटरी पॅड’चे महत्त्वच कळले नसल्याचे बोलले जात आहे.