नागपूरच्या शासकीय दंत रुग्णालयामध्ये लवकरच सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम : अधिष्ठाता गणवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 08:24 PM2019-01-03T20:24:21+5:302019-01-03T20:27:26+5:30
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अतिविशेषोपचार रुग्णालय हे केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवेनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. सुपर स्पेशालिटीमध्ये ‘ओरल इम्प्लांटलॉजी कोर्स’, डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटीक डेन्टीस्ट्री’ व ‘डिजिटल डेन्टीस्ट्री’ हे विभाग सुरू करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती डेंटलच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे (डेंटल) अतिविशेषोपचार रुग्णालय हे केवळ रुग्णांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. नवेनवे अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विशेषत: विदर्भातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. सुपर स्पेशालिटीमध्ये ‘ओरल इम्प्लांटलॉजी कोर्स’, डिपार्टमेंट ऑफ कॉस्मेटीक डेन्टीस्ट्री’ व ‘डिजिटल डेन्टीस्ट्री’ हे विभाग सुरू करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती डेंटलच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांनी दिली.
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) सुवर्ण जयंती इमारतीचा कोनशिलाचे अनावरण शुक्रवारी सांयकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी डॉ. अभय दातारकर व डॉ. वैभव कारेमोरे उपस्थित होते.
डॉ. गणवीर म्हणाल्या, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा सुवर्ण जयंती महोत्सव नुकताच पार पडला. यावेळी उपस्थित मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेडिकलच्या २२०७२ चौरस फूट जागेवर दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या श्रेणीवर्धन व सुपर स्पेशालिटी रुग्णलायासाठी लागणाऱ्या निधीच्या प्रस्तावाला शासनाकडून लवकरच मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर लगेच बांधकामासाठी लागणाऱ्या २२ कोटीला प्रशासकीय मंजुरी मिळाली. यातील पहिल्या टप्प्यातील निधी बांधकाम विभागाच्या तिजोरीतही जमा झाले.
पाच मजल्याचे सुपर स्पेशालिटी
डॉ. गणवीर म्हणाल्या, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या पुढाकारामुळेच सुपर स्पेशालिटीला मेडिकलची जागा मिळाली. या जागेवर सात मजल्याची इमारत प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात मात्र तळमजल्यासह पाच मजली इमारतीचे बांधकाम होईल.
अद्ययावत सोयी उपलब्ध असतील
डॉ. गणवीर म्हणाल्या, सुवर्ण जयंती इमारतीत पदव्युत्तर अभ्यासक्रम प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या नावाखाली ‘अॅडव्हान्स ट्रेनिंग’ दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळण्यासाठी ‘सेंट्रल रिसर्च लेबॉट्रीज्’, ‘अॅडव्हान्स ई-लायब्ररी’, पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सेम्युलेटर लॅब’ असणार आहे.
बीडीएसच्या १०० जागेसाठी प्रयत्न
दंत महाविद्यालयाच्या ‘बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ (बीडीएस) विषयासाठी सध्या ५० जागांना मंजुरी आहे. परंतु सुवर्ण जयंती इमारतीमुळे विविध सोयी उपलब्ध होणार आहेत. यामुळे या जागा वाढून १०० होण्याची शक्यता आहे, असेही डॉ. गणवीर यांनी सांगितले.