सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : महिना होऊनही २० लाखाचे यंत्र डब्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 09:19 PM2019-05-03T21:19:29+5:302019-05-03T21:21:06+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ लाख ८० हजाराचे ११ पेसमेकर तर ११ लाख ९० हजाराचे पोर्टेबल व्हेंटिलेटर येऊन एक महिना झाला आहे. परंतु हे यंत्र डब्यातच बंद आहे. धक्कादायक म्हणजे, या यंत्राचा निधी मेडिकलच्या खात्यात जमा न होताच पुरवठादाराने यंत्र पाठविली आहेत. यामुळे यंत्र ताब्यात घ्यावे किंवा नाही या अडचणीत रुग्णालय प्रशासन सापडले आहे. या संदर्भात प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) कळविले आहे, परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नसल्याचे समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १९ लाख ८० हजाराचे ११ पेसमेकर तर ११ लाख ९० हजाराचे पोर्टेबल व्हेंटिलेटर येऊन एक महिना झाला आहे. परंतु हे यंत्र डब्यातच बंद आहे. धक्कादायक म्हणजे, या यंत्राचा निधी मेडिकलच्या खात्यात जमा न होताच पुरवठादाराने यंत्र पाठविली आहेत. यामुळे यंत्र ताब्यात घ्यावे किंवा नाही या अडचणीत रुग्णालय प्रशासन सापडले आहे. या संदर्भात प्रशासनाने वैद्यकीय शिक्षण विभागाला (डीएमईआर) कळविले आहे, परंतु त्यांच्याकडून उत्तर आले नसल्याचे समजते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सध्याच्या स्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोसर्जरी व एन्डोक्रेनोलॉजी या आठ विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. यात आणखी नव्या विभागाची भर पडावी व रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. पुढील पाच वर्षांत या निधीतून ५० कोटींचे बांधकाम, २५ कोटींचे यंत्र व २५ कोटी मनुष्यबळावर खर्च करण्याचा सूचना आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी रुपये दरवर्षी खर्च करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही आहेत. त्यानुसार रुग्णालय प्रशासनाने २०१७-१८ साठी आवश्यक यंत्रसामुग्रीचा प्रस्ताव हाफकिन महामंडळाकडे पाठविला. नियमानुसार पहिल्या टप्प्यातील २० कोटींचा निधी रुग्णालयाच्या तिजोरीत जमा व्हायला हवा होता, नंतर यंत्रसामुग्री खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकीन महामंडळाच्या खात्यात हा निधी वळता केला जाणर होता. परंतु निधी न मिळता प्रस्तावित यादीतील यंत्र यायला सुरुवात झाली. यात २० लाखाचे सहा पोर्टेबल व्हेंटिलेटर व हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ११ पेसमेकर आहेत. ‘एमआरआय’ व ‘डिजिटल रेडिओग्राफी’ यंत्रही लवकरच उपलब्ध होणार आहे. जे यंत्र उपलब्ध झाले ते स्थापन करण्याचा संबंधित कंपनीने तगादा लावणे सुरू केले आहे. परंतु निधीच मिळाला नसताना यंत्र कसे स्थापन करणार, या अडचणीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सापडले आहे. सूत्रानूसार, याबाबत ‘डीएमईआर’ ला कळविले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतेच उत्तर नाही. परिणामी, यंत्राचा लाभ रुग्णांना न मिळताच डब्यातच बंद आहेत.
‘सुपर’च्या श्वसनरोग विभागात ५० टक्के रुग्ण हे लंग कॅन्सरचे तर इतर रुग्ण हे श्वसनविकाराशी संबंधित असतात. यांना व्हेंटिलेटरची गरज असते. विभागाने याची मागणी लावून धरल्याने हे यंत्र प्रस्तावित होते. परंतु आता व्हेंटिलेटर आले असताना रुग्ण या यंत्राच्या लाभापासून वंचित आहे, असेच धक्कादायक चित्र हृदय रोग विभागातील आहे. निर्णय घेण्यास एवढा उशीर का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.