सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : महिनाभरापासून रखडले मूत्रपिंड प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:01 AM2019-09-27T00:01:10+5:302019-09-27T00:02:20+5:30
दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या देखभालीसाठी येथे एकच विशेष कक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाच्या देखभालीसाठी येथे एकच विशेष कक्ष आहे. जोपर्यंत या कक्षातील रुग्णाला सुटी मिळत नाही तोपर्यंत नवी शस्त्रक्रिया होत नाही. याच कारणामुळे २७ ऑगस्टपासून आतापर्यंत एकही प्रत्यारोपण झालेले नाही. शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या १५ वर रुग्ण मृत्यूच्या दाढेत जगत आहेत.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये पहिली शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत ५५ रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून होत असल्याने अलीकडे रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यातुलनेत केंद्रातील सोयी अपुऱ्या पडत आहेत. विशेषत: प्रत्यारोपण झाल्यानंतर रुग्णाला विशेष देखभालीची गरज असते. हा विशेष कक्ष केवळ एकच आहे. रुग्णाला साधारण एक आठवडा तरी या कक्षात ठेवावे लागते. प्रकृती बिघडल्यास हा कालावधी वाढतो. यामुळे नवे प्रत्यारोपण थांबविले जाते. प्राप्त माहितीनुसार, १४ ऑगस्टला व त्यानंतर २७ ऑगस्टला ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून मिळालेल्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष कक्ष रिकामाच झाला नाही. यामुळे नातेवाईकांकडून दिले जाणारे मूत्रपिंड प्रत्यारोपण थांबलेले आहे. आता महिना होत असतानाही प्रत्यारोपण झाले नसल्याने प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची यादी वाढत चालली आहे. सद्यस्थितीत शस्त्रक्रियेसाठी साधारण तीन ते चार रुग्ण ‘फिट’ असून १५वर रुग्ण प्रतीक्षेत आहेत.
मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्राच्या विकासाची गरज
‘सुपर’चे मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र हे नेफ्रोलॉजी विभागामार्फत चालविले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या केंद्राच्या विकासाची गरज आहे. तज्ज्ञानुसार, पूर्णवेळ मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ, यूरोलॉजी, नेफ्रोलॉजीसह आरोग्य अधिकारी, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. शिवाय, दोन विशेष कक्षासह आवश्यक अद्ययावत यंत्रसामुग्री महत्त्वाची आहे.
आठवड्यात एका प्रत्यारोपणाचा प्रयत्न
पूर्वी महिन्यातून एक किंवा दोन प्रत्यारोपण व्हायचे. आता दर आठवड्याला एक प्रत्यारोपण होत आहे. परंतु प्रत्यारोपणानंतर रुग्णाच्या विशेष देखभालीसाठी एकच कक्ष आहे. यामुळे कक्षातून रुग्णाला सुटी मिळेपर्यंत नवे प्रत्यारोपण थांबविले जाते.
डॉ. चारुलता बावनकुळे
विभागप्रमुख, नेफ्रोलॉजी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल