सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल; चार वर्षात हाफकिनकडून यंत्रखरेदी अवघी १३ टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 07:30 AM2022-03-23T07:30:00+5:302022-03-23T07:30:02+5:30
Nagpur News खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिनकडून वेळेवर खरेदी प्रक्रियाच होत नसल्याने रुग्णसेवेला फटका बसत आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गरीब, निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावा म्हणून यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी सरकार कोट्यवधीचे अनुदान देते. परंतु खरेदीची जबाबदारी असलेल्या हाफकिनकडून वेळेवर खरेदी प्रक्रियाच होत नसल्याने रुग्णसेवेला फटका बसत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने मागील चार वर्षात हाफकिनच्या तिजोरीत जवळपास २२ कोटी जमा केले, परंतु त्यातून केवळ १३ टक्केच म्हणजे ३ कोटीची यंत्राची खरेदी झाली आहे.
औषधे व यंत्रसामुग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयांना लागणारे यंत्र, औषधे व साहित्य खरेदीची जबाबदारी २०१७ मध्ये ‘ हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लिमिटेड ’ कडे देण्यात आली. मात्र, खरेदी प्रक्रियेचा कुठलाही अनुभव नसलेल्या हाफकिनकडून सुरू असलेला पाच वर्षांपासूनचा गोंधळ अद्याप कमी झालेला नाही. प्राप्त माहितीनुसार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने २०१७-१८ या वर्षात ३ कोटी २० लाखांचा निधी हाफकिनकडे वळता केला. परंतु यातून केवळ १ कोटी ८६ लाखांची यंत्राची खरेदी झाली. २०१८-१९ या वर्षात ३ कोटी ७५ लाखांचा निधी जमा करूनही केवळ १ कोटी ५६ लाखांचे यंत्र खरेदी झाले. २०१९-२० या वर्षात ८ कोटी ७१ लाख तर, २०२०-२१ या वर्षात ६ कोटी ७ लाख हाफकिनकडे जमा करूनही यंत्राची खरेदीच झाली नाही. हाफकिनकडे या चार वर्षांतील १८ कोटी ९४ लाख जमा आहेत. नव्या आर्थिक वर्षात आणखी निधी हाफकिनमध्ये जमा होणार असल्याने जमा निधीवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- औषधांचा कृत्रिम तुटवडा !
औषधी खरेदीसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने हाफकिनच्या तिजोरीत मागील तीन वर्षांत जवळपास २ कोटी ६८ लाख जमा केले. परंतु यातून ७५ लाखांच्या ही औषधी खरेदी झालेल्या नाहीत. १ कोटी ९३ लाखांचा निधी आजही हाफकिनकडे पडून आहेत. निधी असूनही औषधांची खरेदी न झाल्याने रुग्णालयात कृत्रिम तुटवडा पडला आहे. रुग्णांना पदरमोड करून बाहेरून औषधी खरेदी करण्याची वेळ आली आहे.